For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅन्टोन्मेंटमधील तीन रस्त्यांचे आर्मीकडे होणार हस्तांतरण

06:09 AM Jul 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
कॅन्टोन्मेंटमधील तीन रस्त्यांचे आर्मीकडे होणार हस्तांतरण
Advertisement

नागरिकांकडून मागविले आक्षेप, आर्मीचा एक रस्ता मिळणार कॅन्टोन्मेंटला

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव

Advertisement

प्रशासकीय दृष्टीकोनातून बेळगाव शहरातील कॅन्टोन्मेंट हद्दीतील तीन रस्ते आर्मीला तर आर्मीचा एक रस्ता कॅन्टोन्मेंटला देण्याचा प्रस्ताव आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून रखडलेला प्रस्ताव पुन्हा एकदा मांडण्यात आला असून कॅन्टोन्मेंट बोर्डकडून यासाठी नागरिकांचे आक्षेप तसेच प्रतिक्रिया मागविण्यात आल्या आहेत. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी आक्षेप अथवा प्रतिक्रिया नोंदविणे आवश्यक आहे.

नानावाडीकडे जाणारा रायगड गेट ते जिंजी गेट हा अल्बर्ट इक्का रोड कॅन्टोन्मेंटकडून एमईएस (आर्मी) ला दिला जाणार आहे. त्याचबरोबर गणेशपूर रोड येथील हर्षन एन्क्लेव्ह ते रामघाट रोडपर्यंतचा स्मार्ट रोड देखील व कॅम्प येथील शर्कत पार्क ते क्वीन गार्डन रोड हा रस्ता आर्मीच्या ताब्यात दिला जाणार आहे. त्याऐवजी शौर्य चौक ते गांधी चौकपर्यंतचा जिमखाना रोड हा आर्मीकडून कॅन्टोन्मेंटच्या ताब्यात दिला जाणार आहे.

रस्ता केव्हाही बंद होण्याच्या भीतीने नागरिकांचा होता विरोध

मागील अनेक वर्षांपासून बेळगाव कॅन्टोन्मेंट हद्दीतील काही रस्ते आर्मीला देण्याचा प्रस्ताव होता. परंतु हा प्रस्ताव रखडला होता. नागरिकांच्या विरोधामुळे रस्ता हस्तांतरीत करण्याचा प्रस्ताव बारगळला. आर्मीच्या ताब्यात रस्ता गेल्यास तो केव्हाही बंद होऊ शकतो, याची भीती नागरिकांना असल्यामुळे यापूर्वी कडाडून विरोध झाला होता. त्यामुळे कॅन्टोन्मेंटकडून हा प्रस्ताव अनेक वर्षांपासून तसाच होता.

30 दिवसांच्या आत आक्षेप नोंदवा

बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डकडून शुक्रवार दि. 24 रोजी पुन्हा एकदा पब्लिक नोटिसीद्वारे रस्त्यांच्या हस्तांतरणाचा प्रस्ताव मांडून नागरिकांचे आक्षेप मागविण्यात आले आहेत. 30 दिवसांच्या आत सीईओ बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्ड यांच्याकडे हे आक्षेप नोंदवायचे आहेत. त्यामुळे ज्या नागरिकांना रस्त्यांच्या हस्तांतरणामुळे गैरसोय होणार आहे, त्यांनी आपले आक्षेप नोंदवायचे आहेत.

Advertisement
Tags :

.