For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उचगाव विभागात रात्री पुन्हा थ्री फेज वीजपुरवठाच

10:22 AM Dec 18, 2023 IST | Tarun Bharat Portal
उचगाव विभागात रात्री पुन्हा थ्री फेज वीजपुरवठाच
Advertisement

दिवसा वीजपुरवठ्यासाठी अर्जविनंत्या-निवेदने देऊनही दुर्लक्षच : कार्यालयाला टाळे ठोकण्याचा शेतकऱ्यांचा इशारा

Advertisement

वार्ताहर /उचगाव

उचगाव विभागामध्ये रात्रीच्या वेळी थ्री फेज विद्युत पुरवठा सुरूच आहे. याबाबत अनेकवेळा अर्ज, विनंती करूनदेखील हेस्कॉमने अद्याप यांची दखल सदर खात्याने घेतली नसल्याने तसेच पुन्हा पुन्हा थ्री फेज विद्युत पुरवठाच रात्रीच्या वेळीच सुरू ठेवत असल्याने या भागातील सर्व शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे उचगाव विभागीय कार्यालयाच्या अधिकारी वर्गाला निवेदन देऊन या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा या भागातील तमाम शेतकरी वर्गाने दिला आहे. संबंधित खात्याला येत्या आठवड्यात निवेदन देऊन पूर्वकल्पना देण्यात येणार असल्याची माहिती उचगाव हेस्कॉम कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी वर्गाने दिली आहे. गोरगरीब शेतकरी अन्नधान्य पिकवण्यासाठी शेतात रात्री जाऊन पिकांना पाणी देण्यासाठी धडपड करत असतात. मात्र कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी मात्र निवांत जाऊन झोप घेतात. शेतकरी रात्रंदिवस अन्नधान्य पिकवण्यासाठी काबाडकष्ट घेतो, धडपड करत असतो. त्यांची दया, काळजी हेस्कॉमच्या खात्याला, शासनाला अथवा लोकप्रतिनिधींना नाही का? अशी विचारणा शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.

Advertisement

हेस्कॉमच्या कार्यालयाला टाळे ठोकून जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारू

जर हेस्कॉम खात्याच्या अधिकारी वर्गाने व कर्मचाऱ्यांनी रात्रभर आराम न करता, झोप न घेता त्यांनी देखील जसे शेतकरी शेतात पाणी पाजण्यासाठी जातात. त्याच वेळेत एखादी अनुचित घटना घडली, विद्युत पुरवठा खंडित झाला तर त्यांची काळजी घेणे अथवा तो विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी रात्री ज्या ज्या वेळी थ्री फेज विद्युत पुरवठा सुरू असतो, त्यावेळी हेस्कॉमचे कार्यालय तसेच अधिकारी आणि कर्मचारी यांनी देखील ड्युटीवर हजर राहावे. अन्यथा उचगाव विभाग हेस्कॉम कार्यालयाला टाळे ठोकून जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालून  जाब विचारला जाईल, असा इशारा शेतकरी वर्गाने दिला आहे.

रात्री वन्यप्राण्यांचा धोका

रात्रीच्या अंधारात शेतकरी शेतात जातो त्यावेळी सर्प व इतर प्राण्यांपासून शेतकऱ्यांना धोका असतो. त्यांची काळजी कोण घेणार, एखादी अनुचित घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्नही शेतकरी वर्गातून विचारला जात आहे. सकाळी सहापासून ते सायंकाळी सहापर्यंतच थ्री फेज शेतातील मोटारींचा विद्युत पुरवठा सुरळीत ठेवावा. रात्रीच्या अंधारात, रात्री शेतात शेतकऱ्यांना जाण्याची वेळ येणार नाही याची दखल लोकप्रतिनिधींनीही घेणे गरजेचे आहे. निवडणूक काळात मते मागण्यासाठी तुम्ही हक्काने येता. मग आता शेतकरी दिवसभर वीज मागतात. तर त्याची दखल का घेत नाही. गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय शासनाने द्यावा. अन्यथा याचे परिणाम मोठे घडू शकतील, असा इशाराही शेतकरी वर्गातून देण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.