उचगाव-बेकिनकेरे परिसरातील थ्री फेज विद्युत पुरवठा तीन दिवसांपासून खंडित
घरातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल
वार्ताहर /उचगाव
उचगाव-बेकिनकेरे परिसरातील शेतवडीतील थ्री फेज वीजपुरवठा गेल्या तीन दिवसापासून सातत्याने खंडित केल्याने शेतवडीत राहत असलेल्या राहत्या घरातील विद्युत पुरवठा खंडित झाला. नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे तसेच विजेवर अवलंबून असणाऱ्या इतर अनेक गोष्टी बंद पडल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. तसेच विद्युत पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने नागरिकांची कुचंबणा होत आहे. तरी हेस्कॉम खात्याच्या अधिकारी वर्गाने शेतवडीतील लाईन काढत असताना नागरिकांना याबद्दलची माहिती द्यावी. तसेच सतत विद्युत पुरवठा खंडित करू नये, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
उचगाव-बेकिनकेरे परिसरातील शेतवडीमध्ये अनेक नागरिक वास्तव्य करून राहतात. या शेतवडीतील विद्युत पुरवठा हा थ्री फेजवरती चालतो. शेतवडीतील लाईन ही रात्रंदिवस पूर्ण वेळ दिली जात नाही. ठराविक वेळेतच विद्युत पुरवठा ठेवला जातो. याचा परिणाम नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यापासून ते घरातील इतर गोष्टींवर याचा परिणाम होत आहे. यासाठी हेस्कॉम खात्याने याकडे सातत्याने लक्ष द्यावे. नागरिकांना याची पूर्वसूचना, कल्पनाही द्यावी आणि विद्युत पुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी या संपूर्ण परिसरातील शेतकरी व नागरिकांतून करण्यात येत आहे.