Konkan Rain Update : दैव बलवत्तर म्हणून बचावले, मासेमारीसाठी गेले अन् नदीपात्रात अडकले
पाण्याचा प्रवाह वाढल्याने लहान बेटावर होते अडकून
चिपळूण : तळकोकणात मान्सून दाखल झाल्यावर पहिल्याच दिवशी चिपळूण तालुक्यात पावसाने धुमाकूळ घातला. पिंपळी खुर्द सोनावरवाडी येथील नदीपात्रामध्ये बांधलेल्या बांधणावर मासेमारीसाठी गेलेल्या महिलेसह तिघेजण रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अडकून पडले.
चारही बाजूने पाण्याने वेढले गेल्यानंतर नदीपात्रातीलच लहानशा बेटावर त्यांनी आसरा घेतला. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. स्थानिक प्रशासनाला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी रात्रीच्या अंधारात थरारक असे बचावकार्य सुरू केले. चार तासानंतर बचावकार्याला यश येऊन तिघांचीही रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सुटका झाली.
अडकलेल्यांमध्ये दळवटणे राजवाडा येथील संतोष वसंत पवार (40), त्याची पत्नी सुरेखा संतोष पवार (35) आणि त्यांचा पुतण्या ओंकार रवी पवार (17) यांचा समावेश होता. दळवटणे आणि पिंपळी या दोन गावांमधून नदी वाहते. त्या नदीपात्रातील बेटावर या तिघांनी बांधण बांधले होते.
बांधण म्हणजे नदीतले मासे पकडण्यासाठी तयार केलेला सापळा. आदिवासी कातकरी समाजाकडून दरवर्षी पावसाळ्यात या भागातील नद्यांमध्ये चढणीचे आा†ण उतरणीचे मासे पकडण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने बांधण बांधतात. कोसळणारा पाऊस आणि नदीत वाढलेले पाणी यामुळे पवार कुटुंब या नदीपात्रात बांधलेल्या बांधणावर रविवारी सायंकाळी मासेमारीसाठी गेले होते.
मोबाईलवरून दिली आपत्तीची माहिती
रविवारी दिवसभर दसपटी भागात पावसाचा जोर वाढल्याने नदीतील पाण्याचा प्रवाह वाढू लागला. मासेमारी करत असतानाच सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास नदीपात्रात चारही बाजूने पाण्याने वेढले गेल्याचे लक्षात आल्यानंतर तिघांनीही नदीपात्रातील बेटाचा आसरा घेतला.
याचवेळी संतोष यांने स्वत:कडे असलेल्या मोबाईलवरुन याबाबतची माहिती नातेवाईक आणि ग्रामस्थांना दिली. ते जेथे थांबले होते तेथे ते सुखरुप होते. मात्र पाऊस सुरुच असल्याने त्यामध्ये पाण्याचा प्रवाह वाढला असता तर धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असती. त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तालुका प्रशासनाला याबाबतची माहिती दिली गेली.
या सगळ्या घटनेची तातडीने दखल घेत चिपळूण तालुका प्रशासनाचे प्रमुख, प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या नेतृत्वाखाली तत्काळ बचावकार्य सुरु केले. तहसीलदार प्रवीण लोकरे, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, प्रांत कार्यालयातील वरीष्ठ लिपिक प्रकाश सावंत यांच्यासह महसूल, पोलीस, नगर परिषदेचे अग्निशमन दल, वैद्यकीय विभाग, महानिर्मिती व आपदा मित्र यांच्या टिम घटनास्थळी पोहचल्या.
आपत्ती व्यवस्थापन टीममधील निखिल पवार, अजय कदम, आकाश कदम दाखल झाले. रवींद्र सागवेकर, नीलेश बेचावडे, चंद्रकांत बैकर, प्राथमिक शिक्षक राजेश गमरे यांच्यासह स्थानिकही दाखल झाले.
एकेकाला बाहेर काढले
प्रांताधिकारी लिगाडे यांनी कोळकेवाडी येथून वीजनिर्मितीनंतर नदीला सोडण्यात येणारे पाणी तातडीने थांबवण्यास सांगितले. पाणी कमी झाल्यानंतर बचावकार्यातील एकजण मोठी दोरी घेऊन अडकलेल्यांपर्यंत पोहचला. तोपर्यंत त्यांना पाण्याजवळ न येता सुरक्षितरित्या बेटांवरतीच उभे रहा, असा धीर देण्यात आला होता.
त्यानंतर एकेकाला नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. वैद्यकीय पथकही तैनात होतं. त्यामुळे बाहेर आलेल्या तिघांचीही तपासणी करुन मग त्यांना त्यांच्या घरी दळवटणेला सोडण्यात आले. तब्बल चार तास रात्रीच्या अंधारात ही बचावकार्याची मोहीम सुरू होती. नदीकाठी प्रशासकीय यंत्रणेसह मोठी गर्दी झाली होती. प्रत्येकजण मदतकार्यासाठी धडपडत होता.
स्थानिक प्रशासनाचे चांगले टीमवर्क दिसून आले. प्रांताधिकारी लिगाडे हे बचाव कार्यातील प्रत्येक अपडेट सोशल मिडीयावर देत होते. पोलीस निरीक्षक फुलचंद मेगडे यांच्यावर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया झाली असतानाही तेही या बचावकार्यात सहभागी झाले होते. पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार राजमानेही या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. स्थानिक प्रशासनाने रविवारी रात्री राबवलेल्या या बचाव मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.