अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलवरील तिघे ठार
अथणी-गोकाक रोडवरील रेहमान धाब्यानजीक घटना
बेळगाव : अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलवरील तीन तरुण ठार झाल्याची घटना सोमवार दि. 2 रोजी रात्री 9.50 च्या दरम्यान अथणी-गोकाक रोडवरील रेहमान धाब्यानजीक घडली आहे. गजानन महादेव वडेयर (वय 22) रा. मोरब, ता. रायबाग, महादेव मल्लाप्पा गोलभावी (वय 22), माळाप्पा मल्लाप्पा गोलभावी (वय 26) दोघेही राहणार मुगळखोड. ता. रायबाग अशी दुर्दैवी मृत्यू झालेल्यांची नावे असून हारुगेरी पोलीस स्थानकात अपघाताची नोंद झाली आहे.
वरील तिघेजण सोमवारी हिरो स्प्लेंडर मोटारसायकल नं. केए 23 ईव्ही 7883 वरून मुगळखोडहून हारुगेरीकडे निघाले होते. दरम्यानच्या रस्त्यावर अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक देऊन पलायन केले. त्यावेळी झालेल्या भीषण अपघातात गजानन आणि महादेव हे दोघेजण जागीच ठार झाले. तर माळाप्पा हा गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी बेळगावातील एका खासगी इस्पितळाकडे हलविण्यात येत होते. मात्र त्याचाही मध्यरात्री 2.30 वाजता मृत्यू झाला.
अपघाताची माहिती समजताच अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख बसरगी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हारुगेरी पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवागृहात हलविले. शवविच्छेदन केल्यानंतर तिन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. एका मोटारसायकलवरून जाणाऱ्या तिघा तरुणांचा मृत्यू झाल्याने रायबाग तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी कलम 281, 106 (1) बीएनएस आणि कलम 134 सहकलम, 187 एमव्ही अॅक्ट नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. सदर अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा पोलिसांनी तपास चालविला आहे.