डीजेच्या वादातून तिघांनी गमावले प्राण
सपा नेत्याच्या मुलाच्या विवाह समारंभातील घटना
वृत्तसंस्था/ कासगंज
उत्तर प्रदेशात कासगंजमध्ये सपा नेत्याच्या मुलाच्या लग्नाच्या उत्सवादरम्यान डीजे वाजवण्यावरून झालेल्या किरकोळ वादानंतर रक्तपाताची मोठी घटना घडली. वर आणि वधूच्या कुटुंबात डीजेवरून वाद झाला. हा वाद हाणामारीत रूपांतरित झाल्यानंतर वराच्या कुटुंबातील सदस्यांनी वधूच्या चुलत भावावर हल्ला केल्याचा आरोप आहे. याच रागातून वधूच्या भावाने आपली गाडी पाच जणांच्या अंगावर घातल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना गंजदुंडवारा पोलीस स्टेशन परिसरातील झेडएस पॅलेस गेस्ट हाऊसमध्ये घडली. या मृत्यूंमुळे सपा नेत्याच्या मुलाचे आनंदी लग्न क्षणार्धात शोकात बदलले. लग्नात झालेला हा वाद सध्या स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय आहे.
सदर लग्न सोहळा कासगंज येथील समाजवादी पक्षाच्या नेत्याच्या मुलाचे होते. या सोहळ्यामुळे दोन्ही कुटुंबे खूप आनंदात होती. लग्नाची मिरवणूक वधूच्या दारात पोहोचली होती. वधू आणि वराचे पक्ष डीजे संगीतावर नाचत होते. डीजेवरून वर आणि वधूच्या पक्षात वाद झाला. शाब्दिक हाणामारीचे रुपांतर हाणामारीत झाले. वराच्या पक्षातील सदस्यांनी वधूच्या चुलत भावाला मारहाण केल्याचा आरोप आहे. यामुळे वधूच्या चुलत भावाला इतका राग आला की त्याने आपली गाडी वराचे काका आणि मामा यांच्यासह इतर नातेवाईकांच्या अंगावर घातली. या दुर्दैवी अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वधूचा भाऊ फरार
या घटनेमुळे घटनास्थळी गोंधळ उडाला. एकाचवेळी तीन जणांच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंब हादरून गेले. घटनेची माहिती मिळताच गंज दुंडवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. आरोपी तरुण फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. पुढील अनुचित घटना टाळण्यासाठी घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.