वैभव नाईक यांच्यासह तिघांची निर्दोष मुक्तता
राजकोट पुतळा दुर्घटनेनंतर सा.बांधकाम कार्यालयातील तोडफोड प्रकरण
कुडाळ -
मालवण - राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पंच धातूचा पूर्णकृती पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मेढा - मालवण सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरून त्या कार्यालयाचा दरवाजा - खिडक्यांच्या काचा फोडून व अन्य साहित्याचे नुकसान केल्याच्या आरोपातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे माजी आमदार वैभव विजय नाईक ( रा . कणकवली) यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरिश्चंद्र उर्फ हरी मोहन खोबरेकर व माजी नगरसेवक मंदार मोहन केणी ( दोन्ही रा.मालवण ) यांची कुडाळ येथील दिवाणी न्यायाधीश जी.ए.कुलकर्णी यांनी निर्दोष मुक्तता केली. 26 ऑगस्ट 2024 रोजी ही घटना घडली होती. या तीनही संशयितांच्यावतीने अँड सुधीर राऊळ,अँड कीर्ती कदम व अँड प्रज्ञेश राऊळ यांनी काम पाहिले. मालवण राजकोट परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पंच धातूचा पूर्णकृती पुतळा उभा केला होता. 26 ऑगस्ट 2024 रोजी दुपारच्या सुमारास सदर पुतळा कोसळला. त्यावेळी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तत्कालीन आमदार वैभव नाईक , हरिश्चंद्र उर्फ हरी खोबरेकर व मंदार केणी यांच्यासह अन्य उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याची पदाधिकारी कार्यकर्ते त्या घटनेच्या ठिकाणी गेले होते. त्यानंतर ते तेथून दुपारी 2.30 वाजण्याच्या मालवण - मेढा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाकडे गेले. वैभव नाईक, मंदार केणी, हरीश्चंद्र खोबरेकर यांनी छत्रपती शिवाजी महारांज यांचा पुतळा हलक्या दर्जाचा बांधला हेच त्याका जबाबदार हत, अशी शिवराळ भाषा बोलून ते कार्यालयात गेले.वैभव नाईक यांच्या हातात लाकडी दांडा होता. त्यानी त्या दांड्याने कार्यालयातील दरवाजा व खिडकीच्या काचा फोडल्या. तसेच सदर कार्यालयातील टेबलावरील काचा व संगणकावर दांडा मारून नुकसान केले. नंतर ते तिघेही निघून गेले होते. याबाबत मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक कैलास शिवाजी ढोले यांनी मालवण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला याला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार धरून लाकडी दांडा घेऊन तेथील सा. बां.विभाग कार्यालयाच्या शासकिय इमारतीच्या दरवाजा व खिडकीच्या काचा ,लाकडी दांड्यांने फोडून कार्यालयातील टेबलावरील काचा व संगणकावर दांडा मारून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी वैभव नाईक, हरी खोबरेकर व मंदार केणी यांच्यावर मालवण पोलीस ठाण्यात सार्वजनिक संपत्ती हानी प्रतिबंधक अधिनियम- 1984 चे कलम 3 सह भारतीय न्याय संहीता-2023 चे कलम 3(5) प्रमाणे मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. कुडाळ येथील दिवाणी न्यायालयात सदर खटला सुरू होता. संशयितांच्यावतीने अँड सुधीर राऊळ,अँड कीर्ती कदम व अँड प्रज्ञेश राऊळ यांनी न्यायालयात केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून येथील दिवाणी न्यायाधीश जी. ए .कुलकर्णी यांनी वैभव नाईक यांच्यासह तिघांची निर्दोष मुक्तता केली.