युवकावरील गोळीबार प्रकरणी दोन युवतींसह तिघांना अटक
गोळीबार करणाऱ्याचा शोध जारी : दोन गोळ्या झाडल्याचे निष्पन्न : तपासासाठी दोन पथके नियुक्त
बेळगाव : बुधवारी रात्री महांतेशनगर येथे युवकावर झालेल्या गोळीबार प्रकरणी दोन युवतींसह तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी ही माहिती दिली आहे. प्रेम प्रकरणातून गोळीबाराची घटना घडली असून प्रत्यक्षात गोळीबार करणाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे. बुधवार दि. 27 नोव्हेंबर रोजी रात्री महांतेशनगर येथील केएमएफ डेअरीजवळ गोळीबार करण्यात आला होता. गोळीबारात प्रणितकुमार डी. के. (वय 32) राहणार द्वारकानगर, टिळकवाडी असे जखमीचे नाव आहे. प्रणितकुमारने दिलेल्या फिर्यादीवरून चौघा जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी निधा कित्तूर, जुबेन किणेकर व अमिर कित्तूर या तिघा जणांना अटक केली आहे.
त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता 115(2), 118(1), 126(2), 109, 33, 352, 351(3), सहकलम 3(5) बरोबरच भारतीय शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत एफआयआर दाखल केला आहे. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी प्रणितकुमार हा बुधवारी अंजनेयनगर येथील स्मिता यांच्या घरी जेवणाला गेला होता. याच ठिकाणी प्रणितकुमारची जुनी मैत्रीण निधालाही बोलाविण्यात आले होते. त्यावेळी तिचे भाऊ व आणखी काही जण तेथे आले. वादावादीनंतर पिस्तुलीने गोळीबार करण्यात आला आहे. प्रणितकुमारवर दोन गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. गोळ्या झाडणारा कोण? याची माहिती मिळाली असून अद्याप त्याला अटक झाली नाही. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी दोन पथके नियुक्त करण्यात आल्याचेही पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.