For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

हुथी बंडखोरांच्या हल्ल्यात भारतीयासह तिघांचा मृत्यू

07:00 AM Oct 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
हुथी बंडखोरांच्या हल्ल्यात भारतीयासह तिघांचा मृत्यू
Advertisement

सौदी विमानतळासह तेलसाठे लक्ष्य : 10 जखमी

Advertisement

वृत्तसंस्था/रियाध

सौदी अरेबियातील विमानतळ आणि तेल सुविधेवर बुधवारी रात्री उशिरा झालेल्या हल्ल्यांमध्ये एका भारतीयासह तीन जण ठार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच अन्य 10 जण जखमी झाले असून त्यात तीन भारतीयांचा समावेश आहे. दम्माम येथील किंग फहद आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या हल्ल्यात एक भारतीय ठार झाला असून दोन भारतीयांसह आठ जण जखमी झाले. अरामको तेल सुविधेवर झालेल्या ड्रोन हल्ल्यात नेपाळ आणि फिलिपाईन्सचा प्रत्येकी एक नागरिक ठार झाला. तसेच अन्य दोघे जखमी झाले. दरम्यान, भारताने या हल्ल्यांचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. गेल्या काही दिवसांत सौदीमध्ये हुथी बंडखोरांकडून होणाऱ्या हल्ल्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

Advertisement

चालू महिन्यात हुथी बंडखोरांनी सौदी अरेबियामध्ये सहा मोठे हल्ले केले असून, त्यात किमान 23 जण ठार आणि 370 जण जखमी झाले आहेत. सौदी अरेबियाच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने गुरुवारी विमानतळावर हल्ला झाल्याची माहिती देत विमानतळाचे नुकसान झाल्याचेही स्पष्ट केले. हल्ला झालेले ठिकाण दम्माम हे पर्शियन आखाताच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. ते बहरीन आणि कतारच्या जवळ आहे. जगभरातील विमानांवर लक्ष ठेवणारी वेबसाइट ‘फ्लाइटरडार24’ ने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हल्ल्यानंतर विमानांचे मार्ग बदलण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. याशिवाय, सौदीच्या नेतृत्वाखालील लष्करी आघाडीने देशाच्या पूर्व भागात चार ड्रोन हल्ले हाणून पाडल्याचे कळवल्याने हल्ल्यांना दुजोरा मिळाला आहे.

सौदीच्या दुतावासाकडून भारताला माहिती

सौदीच्या दुतावास अधिकाऱ्यांनी हुथी बंडखोरांच्या हल्ल्यातील जीवितहानीबद्दल गुरुवारी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला माहिती दिली आहे. या हल्ल्यासंबंधी अधिक माहिती गोळा केली जात असून पीडित कुटुंबांशी संपर्क साधला जात असल्याचे सांगितले. मृतांच्या कुटुंबीयांप्रति आणि त्यांच्या प्रियजनांप्रति आमच्या संवेदना आणि प्रार्थना आहेत, आणि आम्ही जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे कळविण्यात आले आहे. मात्र, सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी दम्माम विमानतळावरील हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांची सार्वजनिकरित्या ओळख जाहीर केलेली नाही.

भारतीयांना लक्ष्य करणे अस्वीकार्य : परराष्ट्र मंत्रालय

परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करत सौदीतील हल्ल्यांबाबत निषेध व्यक्त केला. 21 ऑक्टोबर रोजी सौदी अरेबियामध्ये नागरी आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर सुरू असलेल्या हल्ल्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो. या हल्ल्यांमध्ये नागरिकांचा मृत्यू झाला असून काही जखमीही झाले आहेत. अशा छुप्या हल्ल्यांद्वारे भारतीयांना लक्ष्य करणे अस्वीकार्य असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. रियाधमधील भारतीय दूतावास सौदी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, बाधित भारतीय नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांवरील आणि अत्यावश्यक पायाभूत सुविधांवरील हल्ले पूर्णपणे अस्वीकार्य आहेत आणि ते तात्काळ थांबले पाहिजेत, असेही भारताने निवेदनात म्हटले आहे. सौदी अरेबियाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आम्ही तेथील जनता आणि सरकारसोबत एकजुटीने उभे आहोत. या प्रदेशात लवकरात लवकर शांतता आणि सामान्य स्थिती पुनर्संचयित होईल, अशी अपेक्षाही भारताने व्यक्त केली आहे.

राजदूत, अधिकाऱ्यांना अमेरिकेकडून निर्देश

या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपल्या काही राजनयिकांना आणि सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबासह सौदी अरेबिया सोडण्यास सांगितले आहे. राजदुतावासाचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांची सुरक्षा हे आमचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी स्पष्ट केले. हुथी बंडखोरांनी नागरी विमानतळे आणि इतर महत्त्वाच्या सुविधांवर केलेल्या हल्ल्यांमुळे अमेरिकन राजनयिकांनी माघार घेतली आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू झालेल्या इराणविरुद्धच्या अमेरिकेच्या युद्धाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अमेरिकन दूतावासाचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर, तेथे अत्यंत मर्यादित कर्मचारी काम करत होते. तथापि, गेल्या काही आठवड्यांत काही राजनयिक परतले आहेत.

ऑक्टोबर महिन्यात सौदी अरेबियावर झालेले मोठे हल्ले

  • 6 ऑक्टोबर : जाझान आणि नजरान विमानतळांना लक्ष्य करण्यात आले. सौदी हवाई संरक्षण दलाने एक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र रोखल्याचा दावा केला आहे.
  • 7 ऑक्टोबर : रियाध आणि आभा विमानतळांवर हल्ला झाला. यात तीन परदेशी नागरिक ठार झाले आणि 36 जण जखमी झाले.
  • 8 ऑक्टोबर : रियाध विमानतळावर आणखी एक हल्ला झाला. यात तीन सौदी नागरिक ठार झाले. सरकारी मालकीच्या सौदिया एअरलाइनच्या एका विमानाचेही नुकसान झाले.
  • 10 ऑक्टोबर : रियाध विमानतळावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीय नागरिकासह 13 जण ठार झाले. 300 हून अधिक जण जखमी झाले. त्यानंतर विमानतळावरील विमानसेवा थांबवण्यात आली.
  • 11 ऑक्टोबर : रियाध विमानतळावर क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हल्ला केला. यात एक पाकिस्तानी नागरिक ठार झाला आणि 11 जण जखमी झाले.
Advertisement
Tags :

.