आयएएस अधिकाऱ्यासह तिघांचा अपघाती मृत्यू
कलबुर्गी जिल्ह्यात जेवर्गीनजीक कारला अपघात
प्रतिनिधी/ बेंगळूर
कर्नाटक राज्य खनिज महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आयएएस अधिकारी महांतेश बिळगी यांच्या कारला मंगळवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत महांतेश बिळगी, त्यांचे बंधू शंकर बिळगी आणि इराण्णा शिरसंगी यांचा मृत्यू झाला आहे. एका नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी विजापूरहून कलबुर्गीला जात असताना कलबुर्गी जिल्ह्याच्या जेवर्गी तालुक्यातील गौनळ्ळी क्रॉसजवळ हा अपघात झाला. महांतेश बिळगी यांच्या अपघाती मृत्यूबद्दल मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. मंगळवारी इनोव्हा कारने (केए 04, एनसी 7982) विजापूरहून कलबुर्गीला जात असताना हा अपघात घडला. जेवर्गी तालुक्यातील गौनळ्ळी येथे कुत्रा कारच्यासमोर आल्याने त्याला बसणारी धडक चुकविण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली.
अपघातात शंकर बिळगी आणि इराण्णा शिरसंगी जागीच ठार झाले. तर आयएएस अधिकारी महांतेश बिळगी यांचा कलबुर्गी येथील खासगी इस्पितळात उपचारादरम्यान मृत्यू झाला. महांतेश यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच आयजीपी शंतनू सिन्हा, कलबुर्गीचे जिल्हाधिकारी व इतरांनी इस्पितळाकडे धाव घेतली.
27 मार्च 1974 रोजी जन्मलेले महांतेश बिळगी हे 2012 च्या बॅचचे कर्नाटक केडरचे आयएएस अधिकारी आहेत. ते सध्या कर्नाटक राज्य खनिज महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांनी बेस्कॉम (बेंगळूर वीजपुरवठा निगम)चे व्यवस्थापकीय संचालकपदही सांभाळले होते. त्यांनी दावणगेरे आणि उडुपीसह विविध जिल्ह्यांत सेवा बजावली होती.