For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुहागर समुद्रामध्ये तिघेजण बुडाले, एकाचा मृत्यू

03:19 PM Dec 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
गुहागर समुद्रामध्ये तिघेजण बुडाले   एकाचा मृत्यू
Advertisement

शनिवारी दुपारी 12.30 वाजता ची घटना जीवरक्षकांच्या प्रयत्नांमुळे दोघांचा जीव वाचला

Advertisement

गुहागर/ प्रतिनिधी
ख्रिसमस सुट्टी निमित्त व सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटनाकरिता गुहागर शहरांमध्ये दाखल झालेल्या पर्यटक कुटुंब समुद्रामध्ये पोहण्याचा मोह न आवरल्याने खोल पाण्यात गेल्याने तिघेही बुडाले या तिघांपैकी दोघांना जीवरक्षकांनी वाचवले असून तिसरा व्यक्ती ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्या अगोदरच मयत झाला.
गुहागर समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केली आहे अशामध्येच दुपारी 12.30 वाजताच्या दरम्याने वरचापाट बाजूच्या समुद्रकिनाऱ्यावर मुंबई पवई येथील अमोल विजयकुमार मुथ्थू आपली पत्नी श्वेता व तेरा वर्षाचा मुलगा विहान याच्या समवेत समुद्र स्नानाचा आनंद घेत होते ते आनंद घेत असताना 80 मीटर खोल समुद्रामध्ये पोहत गेले. ते खोल समुद्रामध्ये गेल्याने ते बुडत असल्याचे त्या ठिकाणी मोबाईलवर व्हिडिओ करणारे पवार साखरी येथील अक्षय पवार यांच्या लक्षात आले अक्षय पवारने तातडीने सोहम सातार्डेकर यांना कळवले, सोहम सातार्डेकर यांनी गुहागर नगरपंचायतीमधील कर्मचारी ओंकार लोखंडे याला माहिती दिली. यावर तसेच तहसीलदार परीक्षित पाटील यांनी गुहागर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण यांना माहिती देताच, मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण यांनी तातडीने नगरपंचायत कर्मचारी व जीव रक्षक म्हणून काम करणारे आशिष सांगळे यांना सदर घटनेकडे जाण्याचे सांगितले. अशावेळी गुहागर समुद्रकिनाऱ्यावर जीव रक्षक म्हणून काम करणारे प्रदेश तांडेल याला माहिती कळताच त्याने गुहागर वॉटर स्पोर्ट च्या कर्मचाऱ्यासह तातडीने सुमारे एक किलोमीटर अंतर पार करत बुडणाऱ्या तिघांना पाण्याबाहेर काढले. अवघ्या पाच ते सहा मिनिटांमध्ये गुहागरच्या नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी दाखवलेली ही तत्परता यामुळे या तिघांचे जीव वाचतील असे वाटत होते. अशावेळी मयत झालेले अमोल विजयकुमार मुथ्थू हे अति गंभीर दिसत होते. आशिष सांगळे, प्रदेश तांडेल या दोघांनी अमोलला सीपीआर दिला. सलग तीन ते चार वेळेला सीपीआर देऊन मिळेल त्या वाहनाने गुहागर ग्रामीण रुग्णालय गाठले. रस्त्याचे काम चालू असल्याने छोट्या रस्त्याने वाहतूक करत असताना त्यावेळी मदतीसाठी उपस्थित असलेले सोहम सातार्डेकर यांनी संपूर्ण वाहने थांबून अपघातग्रस्त अमोलला ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली. ग्रामीण रुग्णालयाच्या आवारापर्यंत त्याची धडधड चालू होती. मात्र पुढील उपचार सुरू असतानाच तो मयत झाला.
अमोल विजयकुमार मुथ्थू, वय 42 राहणार पवई मुंबई असे बुडून मयत झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. तर त्याच्यासोबत आलेली त्याची पत्नी श्वेता अमोल मुथ्थू, वय 42, मुलगा विहान अमोल मुथ्थू, वय 13 या दोघांचे प्राण केवळ नगरपंचायतीच्या जीवरक्षकांच्या व त्यांना सहकार्य करणारे गुहागर वॉटर स्पोर्ट चे कर्मचारी, सोहम सातार्डेकर यांच्यामुळेच या दोघांचे प्राण वाचले आहे.
गुहागर समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणावर पर्यटक आले असताना अशा प्रकारच्या घटनेने पर्यटनाला गालबोट लागते मात्र खोल समुद्रात समुद्र स्नानासाठी जाऊ नये असे सूचना करूनही अनेक जण समुद्रामध्ये स्नानासाठी जातात. असे असतानाही शनिवारी गुहागर नगरपंचायतीच्या प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यांसमवेत दाखवलेली तत्परता ही पर्यटकांच्या सुरक्षेची सर्वात मोठे कामगिरी ठरली आहे. समुद्र स्नानाचा आनंद घ्या परंतु ते कमी पाण्यामध्ये हे आलेल्या पर्यटकांना केव्हा कळणार ? असा प्रश्न निर्माण होत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.