अतिक्रमण हटाव पथकावरील हल्ल्याप्रकरणी तिघा जणांना अटक
खासबागमध्ये शुक्रवारी झाला होता हल्ला
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
खासबाग येथे अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या पथकावर हल्ला केल्याच्या आरोपावरून शहापूर पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली होती.
खासबाग डबल रोडवरील अतिक्रमण हटविताना महानगरपालिकेच्या पथकावर हल्ला झाला होता. साहाय्यक कार्यकारी अभियंते अंकित राजेंद्र (वय 34) यांनी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. पोलीस निरीक्षक सिद्धाप्पा सिमानी, उपनिरीक्षक व्हन्नाप्पा तळवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तिघा जणांना अटक केली आहे.
सैफुल्ला अब्दुलरऊफ फत्तेखान (वय 30), तौसिफअहमद मेहबूबसाब पटेल (वय 44), सिमरन जहीर मुल्ला (वय 30) तिघेही राहणार नवी गल्ली, शहापूर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शुक्रवार दि. 23 ऑक्टोबर रोजी जेसीबीने अतिक्रमणे हटविताना जेसीबीच्या काचा फोडण्यात आल्या होत्या.
मनपा अधिकाऱ्यांना शिवीगाळ करीत सरकारी कामात अडथळे आणल्याचा ठपका ठेवत चार ते सहा जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. यापैकी तिघा जणांना शहापूर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी फरार असलेल्या आणखी काही जणांचा शोध घेण्यात येत आहे.
