छत्तीसगड-ओडिशा सीमेवर चकमकीत तीन नक्षली ठार
मृतदेहांसह स्वयंचलित शस्त्रे हस्तगत
वृत्तसंस्था/ गरियाबंद
छत्तीसगडमधील गरियाबंद जिल्ह्यातील नक्षलग्रस्त सोरनामल जंगलात सुरक्षा दलांनी तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीवेळी जिल्हा राखीव दल (डीआरजी) आणि स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) पथकाने नक्षलवाद्यांना चारही बाजूंनी घेरले होते. या नक्षलविरोधी कारवाईमध्ये छत्तीसगड-ओडिशातील सुमारे 300 जवान घटनास्थळी उपस्थित होते. घटनास्थळावरून मृतदेह आणि स्वयंचलित शस्त्रs हस्तगत करण्यात आली आहेत. गारियाबंदचे पोलीस अधीक्षक निखिल राखेचा यांनी या चकमकीला दुजोरा दिला आहे.
छत्तीसगड आणि ओडिशाच्या सीमेला लागून असलेल्या सोरनामल जंगलात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांना चारही बाजूंनी घेरले होते. त्यामुळे नक्षलवादी पळून जाऊ शकले नाहीत. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटवली जात आहे. हे नक्षलवादी बस्तरमधून पळून गरियाबंदमध्ये दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे. नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानंतर शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही सुरक्षा दलाकडून शोधमोहीम सुरू होती. अशा कारवाईमुळे परिसरातील नक्षलवादी प्रकरणांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल, असे सुरक्षा दलाचे म्हणणे आहे.