Pandharpur News : कोर्टी शिवारात शेततळ्यात बुडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
एकाच कुटुंबातील तिघांचा शेततळ्यात दुर्दैवी अंत
पाटकुल : पंढरपूर तालुक्यातील कोर्टी शिवारात एका शेतातील शेततळ्यामध्ये पडून एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाला असून मृतांमध्ये एका पाच वर्षाच्या चिमुरड्याचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार कोर्टी शिवारात सुरेश लाड यांचं शेत आहे या शेतामध्ये पाटकुल तालुका मोहोळ येथील विजय राजकुमार लोंढे (वय ३०) हे आपली पत्नी प्रियांका विजय लोंढे (वय २८) व दोन चिमुरड्यांसह राहत होते .
शेतात मोल मजुरी करून हे कुटुंब आपला उदरनिर्वाह करत होते .सोमवार दि. ०८ रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास त्यांचा ५ वर्षाचा मुलगा प्रज्वल विजय लोंढे हा शेतामध्ये खेळत असताना खेळता खेळता तो शेततळ्यामध्ये पडला, त्याला वाचवण्यासाठी प्रियांका यांनी शेततळ्यामध्ये उडी मारली हे पाहून विजय हे देखील धावत आले आणि त्या दोघांना वाचवण्यासाठी त्यांनी देखील शेततळ्यात उडी मारली, मात्र पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेवाळ असल्यामुळे त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्यामुळे या तिघांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. आसपासच्या लोकांनी शेततळ्याकडे धाव घेतली मात्र तो पर्यंत उशीर झाला होता.
पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील पोलीस उपनिरीक्षक वीरसेन पाटील आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली पंप लावून व एका बाजूने शेततळे फोडून पाणी काढण्यात आले, त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. पाच वर्षीय चिमूरड्याचा व त्याच्यासह याच्या आई-वडिलांचा म्हणजेच एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाल्यामुळे परिसरात शोककळा पसरली होती. मृतांच्या नातेवाईकांनी काळीज पिळवटून टाकणारा टाहो फोडला हा प्रसंग पाहून पोलिसांसह उपस्थित आमचे डोळे देखील पाणावले होते.