‘साहील’च्या अवयवदानामुळे तिघांचा वाचला जीव
गोमेकॉचे डिन डॉ. शिवानंद बांदेकर यांची माहिती
पणजी : केरळच्या मृत झालेल्या एका 22 वर्षीय तरुणाच्या अवयवदानामुळे तीन रुग्णांना जीवनदान मिळाले असून चालू 2025 वर्षात अशा अवयवदानामुळे 11 जणांचे जीव वाचल्याची माहिती गोमेकॉचे डिन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे. मोपा विमानतळावर नोकरी करणाऱ्या ‘साहील’ नामक तरुणाचे निधन झाले तेव्हा त्याचे अवयवदान करण्याचा निर्णय कुटुंबाने घेतला. त्याची संपूर्ण प्रक्रिया काल मंगळवारी झाली. सदर तरुणाची दोन्ही मूत्रपिंडे गोमेकॉतील दोन रुग्णांना देण्यात आली तर यकृत (लिव्हर) औरंगाबाद - महाराष्ट्र येथे एका रुग्णासाठी पाठवण्यात आले. त्यामुळे तीन रुग्णांना नवसंजीवनी मिळाली आणि हे अवयवदानामुळे शक्य झाल्याचे डॉ. बांदेकर यांनी सांगितले. अवयवदान करण्यासाठी आता अनेक कुटुंबे पुढे येत असून त्याची कार्यवाही गोमेकॉत होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यकृताची वाहतूक करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.