दोन गटातील संघर्षात मणिपूरमध्ये तीन ठार
उखऊलमध्ये हिंसाचार : जमिनीच्या वादातून गोळीबार
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमधील उखऊल जिल्ह्यात बुधवारी नागा समुदायाच्या दोन बाजूंमध्ये गोळीबार झाला. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला. तर 10 हून अधिक जखमी झाले आहेत. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस)- 2023 च्या कलम 163 च्या उपकलम 1 अंतर्गत या भागात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. पुढील आदेशापर्यंत लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.
हिंसाचारात सहभागी असलेले दोन्ही पक्ष नागा समुदायाचे असून ते हनफुन आणि हंगपुंग नावाच्या दोन वेगवेगळ्या गावातील आहेत. दोन्ही बाजू एकाच जमिनीवर दावा करत असल्याच्या वादातून स्वच्छता मोहिमेचा भाग म्हणून वादग्रस्त जागेच्या साफसफाईवरून दोन पक्षांमध्ये हाणामारी झाली. या तणावानंतर परिसरात आसाम रायफल्सच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे.
चुरचंदपूरमध्ये दहशतवाद्याला कंठस्नान
दुसरीकडे, मंगळवारी चुरचंदपूर जिल्ह्यातील लीशांग गावाजवळ बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या टाऊन कमांडरची अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली. सेखोहाओ हाओकीप असे मृताचे नाव असून तो चुरचंदपूर जिह्यातील कापरांग गावचा रहिवासी होता. मृत युनायटेड कुकी नॅशनल आर्मीचा (यूकेएनए) सदस्य असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी हाओकीपचा मृतदेह चुराचंदपूर मेडिकल कॉलेजच्या शवागारात ठेवला आहे.
मणिपूरमधील कुकी-मैतेई यांच्यात सुरू असलेल्या हिंसाचाराला जवळपास 500 दिवस झाले आहेत. या काळात 237 मृत्यू झाले असून 1500 हून अधिक लोक जखमी झाले. 60 हजार लोक आपली घरे सोडून मदत छावण्यांमध्ये राहत आहेत. या प्रकरणात सुमारे 11 हजार एफआयआर नोंदवण्यात आले असून जवळपास 500 जणांना अटक करण्यात आली. या काळात महिलांची नग्न धिंड, सामूहिक बलात्कार, जिवंत जाळणे, गळा चिरून मारणे अशा घटना घडल्या.