तीन इराणी सैन्यकमांडर इस्रायलच्या हल्ल्यात ठार
इराणमध्ये गेल्या 8 दिवसात 657 लोकांचा मृत्यू : दोन्ही देशांमधील संघर्षाची धार दिवसेंदिवस अधिकच तीव्र
वृत्तसंस्था/ तेहरान
इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेला संघर्ष गेल्या दहा दिवसांपासून सुरू आहे. इस्रायली सैन्याने शनिवारी इराणी सैन्याच्या 3 कमांडरना ठार मारल्याचा दावा केला आहे. यामध्ये ड्रोन युनिट, आयआरजीसी कुद्स फोर्स आणि आयआरजीसीच्या पॅलेस्टिनी प्रकरणांशी संबंधित अधिकाऱ्याचा समावेश आहे. इस्रायलने इराणमधील खोरामाबाद, कोम, इस्फहान शहरांवरही क्षेपणास्त्रs डागली. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. दुसरीकडे, इराणने शनिवारी सकाळी तेल अवीव आणि इस्रायलमधील इतर शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. तथापि, कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर महत्त्वाची टिप्पणी केली आहे. आपण इस्रायलला युद्ध थांबवण्यास सांगणार नाही. सध्या, इस्रायल युद्धात पुढे आहे. त्यामुळे त्यांना थांबवणे कठीण आहे. इस्रायलने 13 जून रोजी सकाळी पहिल्यांदा इराणवर हल्ला केला. गेल्या 8 दिवसात इराणमध्ये 657 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 2000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. इस्रायलमध्ये 24 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 900 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
इस्रायली सैन्याने इराणच्या शिराझ शहरातील लष्करी तळावर हल्ला केला आहे. हल्ल्यानंतर घटनास्थळावरून धूर निघताना दिसत होता. परंतु कोणत्याही जीवितहानीबद्दल त्वरित माहिती देण्यात आली नाही. इराणचे सरकारी वृत्तपत्र नूर न्यूजने देशाच्या आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने 13 जून रोजीच्या इस्रायली हल्ल्यानंतर इराणमध्ये किमान 430 नागरिकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. तसेच 3,500 जण जखमी झाले आहेत. तर अमेरिकेतील ह्युमन राईट्स अॅक्टिव्हिस्ट्स न्यूज एजन्सीनुसार, इराणमध्ये 657 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये उच्च लष्करी अधिकारी आणि अणुशास्त्रज्ञांचा समावेश आहे.
भारताचे शांततेसाठी प्रयत्न
इस्रायल आणि इराणमधील वाढता तणाव भारतासाठी आव्हान बनत आहे. जर हे युद्ध आणखी वाढले तर भारत कोणाला पाठिंबा देईल याबद्दल मतमतांतरे दिसून येत आहेत. मुख्यत: भारताचे दोन्ही देशांशी चांगले संबंध आहेत. भारताने इस्रायलकडून अनेक प्रगत शस्त्रs खरेदी केली असून त्यात बॅरॅक-8 क्षेपणास्त्रs, ड्रोन, लोटेरिंग दारूगोळा यांचा समावेश आहे. हा भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच वेळी, भारत इराणकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी करतो. तसेच, इराणच्या चाबहार बंदर प्रकल्पाद्वारे भारताला पाकिस्तानला बायपास करून अफगाणिस्तान आणि मध्य आशियामध्ये थेट प्रवेश मिळतो. तज्ञांच्या मते, भारताला त्याच्या संरक्षण भागीदारी आणि चाबहार बंदरासारख्या प्रकल्पांसाठी दोन्ही देशांशी चांगले संबंध राखावे लागतील. जर हे युद्ध लांबले तर ते भारतासाठी अडचणीचे कारण ठरू शकते. गेल्या आठवड्यात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने इस्रायल-इराण तणावावर चिंता व्यक्त करणारे निवेदन जारी करताना दोन्ही देशांना तणाव कमी करण्याचे आवाहन केले होते.