तीन भारतीय पर्यटकांचे थायलंडमध्ये अपहरण
पाच भारतीयांना अटक : पाकिस्तान-दुबई कनेक्शनही उघड
वृत्तसंस्था
नवी दिल्ली
थायलंडमध्ये तीन भारतीय पर्यटकांचे अपहरण करून त्यांच्या कुटुंबीयांना खंडणीसाठी ओलीस ठेवल्याची घटना समोर आली आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, पोलिसांनी या अपहरणप्रकरणी पाच भारतीय नागरिकांना अटक केली आहे. चौकशीदरम्यान, आरोपींनी एका पाकिस्तानी नागरिकाने त्यांना हे अपहरण करण्याचे निर्देश दिल्याचे स्पष्ट केल्यानंतर यात दुबई कनेक्शनही समोर आले आहे.
अपहरण प्रकरणातील पीडितांची ओळख मोहित (23), आशिष (24) आणि हिमांशू (20) अशी पटली आहे. आरोपींनी त्यांना स्वस्त सात-दिवसीय टूर पॅकेजचे आमिष दाखवून थायलंडमधील पट्टाया येथे बोलावले. तिथे पोहोचल्यावर त्यांना एका घरात ओलीस ठेवून त्यांच्या कुटुंबीयांकडे प्रत्येकी 40 लाख रुपयांप्रमाणे एकूण 1.20 कोटी रुपयांची खंडणी देण्यास सांगण्यात आले होते. तसेच त्यांना अनेक दिवस उपाशी ठेवण्यात आले, बांधून ठेवण्यात आले, उलटे टांगण्यात आले आणि निर्घृणपणे मारहाण करण्यात आल्याचे पीडितांनी पोलिसांना सांगितले.
कटातील सूत्रधाराच्या दुबईतून सूचना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अवतार सिंग (38), जगजीत सिंग (38), रामभलक कुमार (24), सुखबीर सिंग (37) आणि कुलरा सिंग (27) अशी आहेत. चौकशीदरम्यान ते गेल्या महिन्याभरापासून दुबईस्थित एका पाकिस्तानी नागरिकाच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानेच या अपहरणाचा कट रचला होता. खंडणी क्रिप्टोकरन्सीद्वारे देण्याचे ठरले होते. त्याबदल्यात आरोपींना थायलंड सोडण्यासाठी रोख रक्कम, मौल्यवान वस्तू आणि विमानाची तिकिटे देण्याचे वचन देण्यात आले होते.