तीन भारतीय तटरक्षक सैनिक बेपत्ता
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताच्या ध्रूव हेलिकॉप्टरचे समुद्रात तातडीने अवतरण करावे लागले असून या घटनेत भारतीय तटरक्षक दलाचे तीन सैनिक बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. गुजरातच्या सागरतटानजीक ही घटना मंगळवारी घडली. या तटरक्षकांचा शोध घेण्यात येत आहे. त्यासाठी चार नौका आणि दोन विमानांची नियुक्त करण्यात आली आहे.
चार तासांच्या शोधानंतर एक सैनिकाला वाचविण्यात आले असून आणखी तिघांचा शोध घेण्यात येत आहे. सापडलेला सैनिक जखमी अवस्थेत असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. तातडीने उतरविण्यात आलेले हेलिकॉप्टरही शोधण्यात आले आहे. मात्र, ते मोठ्या प्रमाणात अपघातग्रस्त स्थितीत आहे.
वादळग्रस्तांना वाचविले
अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचा उपयोग गुजरातच्या सागरतटानजीक घोंघावणाऱ्या समुद्री वादळात अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी करण्यात येत होता. या हेलिकॉप्टरने 67 लोकांचे प्राण वाचविण्यात यश मिळविले होते. याच प्रयत्नांमध्ये असताना त्यात तांत्रिक दोष निर्माण झाला होता आणि त्यामुळे ते मंगळवारी सकाळी अपघातग्रस्त झाल्याने तातडीने उतरवावे लागले होते.
‘हरी लिला’च्या साहाय्यतेसाठी
दोन दिवसांपूर्वी भारताची हरि लिला ही वाहतून नौका अपघातग्रस्त झाली होती. त्यावेळी या नौकेवरुन कर्मचारी वर्गाला सुरक्षित स्थळी पोहचविण्यासाठीही या हेलिकॉप्टरचे साहाय्य घेण्यात आले होते. याच अभियानात सहभागी होत असताना हे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त होऊन त्यांचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते.