दिल्लीत गोळीबाराच्या तीन घटना
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताची राजधानी दिल्लीत गेल्या 24 तासांमध्ये गोळीबाराच्या तीन घटना घडल्याने जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नसले तरी घटना ज्या परिसरांमध्ये घडल्या, तेथील नागरीकांनी चिंता व्यक्त केली. गोळीबाराच्या या घटनांमध्ये गुंडांच्या विविध टोळ्यांचा समावेश असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. गुंडांचा माग काढण्यासाठी तीन पथके पाठविण्यात आली आहेत. महिपालपूर भागात एका हॉटेलवर काही गुंडांनी हल्ला करुन गोळीबार केला. त्यानंतर काही वेळातच नांगलोई भागात एका मिठाईच्या दुकानात गोळीबार करण्यात आला. तिसरी घटना एका कार शोरुममध्ये घडली. येथे 20 गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती देण्यात आली. गोळीबाराचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. दहशतवादी कृत्यांची शक्यताही नाकारण्यात आलेली नाही. मात्र, प्रथमदर्शनी हे प्रकार स्थानिक टोळ्यांमधील अंतर्गत वादामुळे झाले असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सर्व शक्यता गृहित धरुन तपासकार्य केले जात आहे. लवकरच गुंडांना अटक होईल, असे प्रतिपादन अधिकाऱ्यांनी केले.