For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तीन ठिकाणी तीन बालिकांचा दुर्दैवी अंत

08:09 AM May 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
तीन ठिकाणी तीन बालिकांचा दुर्दैवी अंत
Advertisement

रविवारची सायंकाळ ठरली ह्य्दयद्रावक, आगोंद, कळंगुट, शिरवई येथील घटना  : दोन बालिका पर्यटक, एक स्थानिक

Advertisement

प्रतिनिधी/काणकोण, म्हापसा, मडगाव

रविवारी एकाच दिवशी गोव्याच्या तीन ठिकाणी बुडून तीन बालिकांना दुर्दैवी मृत्यू आला. आगोंद किनाऱ्यावर आपल्या कुटुंबीयांसमवेत आलेल्या इमदाद आफ्रोज सैजी यांच्या फातिमा या तीन वर्षांच्या बालिकेला जलतरण तलावात बुडून मृत्यू आला. कळंगुट-बागा येथील समुद्रकिनाऱ्यावर खेळता खेळता खोल समुद्रात गेलेल्या झोया खान या सहा वर्षीय बालिकेचा बळी गेला. तर शिरवई-केपे येथे खेळताना कालव्याच्या पाण्यात बुडून सेहर नासिर या 10 वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला.

Advertisement

अधिक माहितीनुसार दिल्ली येथून पर्यटनासाठी आगोंद किनाऱ्यावर आपल्या कुटुंबीयांसमवेत आलेल्या इमदाद आफ्रोज सैजी यांच्या तीन वर्षांच्या बालिकेला जलतरण तलावात बुडून मृत्यू येण्याची दुर्घटना 4 मे रोजी घडली. मयत बालिकेचे नाव फातिमा असे आहे.

काणकोणच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली येथील इमदाद आपली पत्नी आणि तीन मुलांसहित आगोंद किनाऱ्यावरील द रोज रिसॉर्टमध्ये उतरले होते. 4 मे रोजी दुपारी सगळे कुटुंब जेवण घेत असताना जवळच असलेल्या जलतरण तलावाजवळ सदर मुलगी कधी पोहोचली आणि कधी पाण्यात पडली ते समजलेच नाही. त्यावेळी अन्य दोन मुले जवळच खेळत होती. पाण्यात बुडालेल्या मुलीला काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ आणले असता त्या ठिकाणी तिला मृत घोषित करण्यात आले. या दुर्घटनेने सदर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून काणकोणचे पोलिस निरीक्षक हरिश रा. देसाई यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि बालिकेचा मृतदेह शवचिकित्सेसाठी ताब्यात घेतला. या प्रकरणी काणकोणचे पोलिस उपनिरीक्षक विशाल वेळीप पुढील तपास करत आहेत.

बागा येथे बुडाली झोया खान

कळंगुट-बागा येथील समुद्र किनाऱ्यावर खेळता खेळता सोबतच्या व्यक्तीचे लक्ष चुकवून खोल समुद्रात गेलेल्या व पाण्यात गटांगळ्या खाणाऱ्या झोया खान (उत्तर प्रदेश) या 6 वर्षीय बालिकेला वाचवण्याचा जीवरक्षकांनी केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी 4 मे रोजी सायंकाळी उशिरा सदर बालिका भावासोबत किनाऱ्यावर खेळत होती. तेव्हा नजर चुकवून झोया समुद्रात गेली, मात्र नंतर ती दिसेनाशी झाल्याचे लक्षात येताच ज्या व्यक्तीसोबत ती आली होती, त्यांनी शोधाशोध केली, तेव्हा तेथील जीवरक्षकांना ती गटांगळ्या खात असल्याची दिसली. त्यांनी तिला बाहेर काढले. जीवरक्षकांनी तिला प्रथमोपचार दिले. ऊग्णवाहिकेला बोलावले मात्र ती वेळेत न आल्याने अत्यवस्थ स्थितीत तिला खासगी वाहनाने कांदोळी आरोग्य केंद्रात नेले. तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक तसेच किनारी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि घटनेमागील चौकशी सुरू केली.

शिरवईत बुडाली सेहर नासिर

देऊळमळ-शिरवई, केपे येथे खेळताना तेथील कालव्याच्या पाण्यात पडून 10 वर्षीय बालिकेला मृत्यू येण्याची घटना रविवारी 4 मे रोजी रात्री घडली. मयत बालिकेचे नाव सेहर नासिर असे आहे. दक्षिण गोव्याच्या पोलिस मुख्यालयाने सोमवारी सायंकाळी उशिरा या प्रकरणी माहिती दिली.  या बालिकेचा मृतदेह तरंगताना आढळला तेव्हा मयताच्या कुटुंबानी मृतदेह नातेवाईकांच्या घरी नेला होता. या प्रकरणी पेडामळ शिरवई येथील जोस्पाक शेख यांनी केपे पोलिसस्थानकाला या प्रकरणी माहिती दिली. पोलिस तपासात असे आढळून आले की मृतदेह पाण्यातून वर काढल्यानंतर या संबंधी पोलिसांना माहिती न देता मृतदेह नातेवाईकांच्या घरी नेण्यात आला. शवचिकित्सा अहवालात पाण्यात बुडाल्याने मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी केपे पोलिस स्थानकाच्या उपनिरीक्षक जॉयसी कार्व्हालो याप्रकरणी पुढीत तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :

.