काले येथे पंधरा दिवसात तीन मुलींच्या आत्महत्या
कराड :
कराड तालुक्यातील काले परिसरातील अकरावीत शिक्षण घेणाऱ्या तीन मुलींनी 15 दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्त्या केली. तीन मुलींच्या आत्महत्यांचे कारण अद्याप स्पष्ट नसून या तीनही घटनांचा एकमेकांशी काहीही संबध नसल्याचे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे. मात्र वयात आलेल्या मुलींच्या आत्महत्येने पालकांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, 15 दिवसांपूर्वी काले (ता. कराड) येथे अकरावीत शिक्षण घेणाऱ्या युवतीने आत्महत्या करत जीवन संपवले. मुलीच्या आत्महत्त्येने पालकांना मोठा धक्का बसला. या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच 5 दिवसांपूर्वी काले गावालगत असलेल्या धोंडेवाडी गावातील दुसऱ्या एका मुलीने आत्महत्त्या केली. ही मुलगीही अकरावीतच शिक्षण घेत होती. काले येथील घटनेनंतर सलग दुसरी आत्महत्त्या धोंडेवाडीत झाल्याने चर्चांना उधाण आले. तोपर्यंत रविवारी 2 मार्च रोजी काले येथीलच अन्य एका युवतीनेच आत्महत्या केली. अवघ्या 15 दिवसात चार ते पाच दिवसांच्या फरकाने तीन मुलींनी आत्महत्या केल्याने पोलिसांकडून तपास सुरू आहे. या तीनही मुली वेगवेगळ्या महाविद्यालयात शिकण्यास होत्या.
पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी तीन महाविद्यालयीन युवतींच्या आत्महत्त्येचे प्रकरण अत्यंत काळजीपूर्वक हाताळण्यास सुरूवात केली आहे. या आत्महत्या नेमक्या का झाल्या यासंदर्भात चौकशी सुरू असून जगताप हे स्वत: चौकशी करत आहेत. या तीनही आत्महत्येच्या घटनांचा सध्या तरी एकमेकांशी काहीही संबंध नाही. मात्र तीन आत्महत्या झाल्याने पोलीस सावधगिरीने तपास यंत्रणा राबवत आहेत.