For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडी अपघातात गिरीतील तिघांचा बळी

02:58 PM Jun 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
सावंतवाडी अपघातात गिरीतील तिघांचा बळी
Advertisement

थार जीप पुलाचा कठडा मोडून कोसळली खोल दरीत : मुंबई-गोवा महामार्गावर नेमळे येथे भीषण अपघात

Advertisement

वार्ताहर/सावंतवाडी 

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नेमळे-एरंडोकवाडी (सावंतवाडी) येथे सोमवारी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. वेगात असणारी थार जीप (जीए-03/एएम-8478) पुलाचा कठडा तोडून सुमारे 20 फूट खोल शेतात कोसळली. कारने हवेत तीन पलट्या घेतल्याने गाडीचा चक्काचूर झाला. या दुर्दैवी घटनेत कारमधील तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, दोघेजण गंभीर जखमी आहेत. अचानक डुलकी लागल्याने वाहनावरील ताबा सुटून हा अपघात झाल्याची कबुली चालकाने पोलिसांना दिली आहे. या अपघातात गोव्यातील म्हापसा-गिरी येथील पांडुरंग विष्णू नानोडकर (65), त्यांची पत्नी श्रीमती पांडुरंग नानोडकर (53) आणि त्यांची मेहुणी विलासिनी जगन्नाथ सातार्डेकर (70, रा. भिरवंडे भिवनेवाडी, जि. सिंधुदुर्ग) यांचा मृत्यू झाला. कारचालक सनी पांडुरंग नानोडकर (40), उज्ज्वला नारायण कांबळी (50, दोन्ही रा. म्हापसा-गोवा) गंभीर जखमी झाले आहेत. सुरुवातीला गंभीर जखमी असलेले पांडुरंग विष्णू नानोडकर यांना सावंतवाडी उपजिल्हा ऊग्णालयात दाखल केले होते. तेथे प्राथमिक उपचार करून गोवा-बांबोळी उपचारासाठी दाखल केले असता काहीवेळाने त्यांचाही मृत्यू झाला. अपघाताची माहिती समजताच जखमींच्या गोवा आणि कणकवली-भिरवंडे येथील नातेवाईकांनी सावंतवाडी उपजिल्हा ऊग्णालयात धाव घेतली. तेथे कुटुंबियांनी आक्रोश केला.

Advertisement

दुपारी एक वाजता निघाले

कणकवली-भिरवंडे येथील विलासिनी सातार्डेकर या आपल्या म्हापसा-गिरी येथील बहीण श्रीमती नानोडकर यांच्याकडे कामानिमित्त गेल्या होत्या. सोमवारी विलासिनी यांना पुन्हा गावी भिरवंडे येथे सोडण्यासाठी श्रीमती नानोडकर, त्यांचे पती पांडुरंग नानोडकर, मुलगा सनी नानोडकर, नातेवाईक उज्ज्वला नारायण कांबळी अशी एकाच कुटुंबातील पाचजण आपल्या थार गाडीने दुपारी एक वाजता म्हापशाहून निघाले. दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील सावंतवाडी तालुक्यातील नेमळे येथे आल्यानंतर चालक सनी नानोडकर याला झोप अनावर झाल्याने जीपचा ताबा सुटून पुलाच्या कठड्याला ठोकर देत तीन पलट्या घेत 20 फूट खोल कोसळली. जखमी चालकाने या अपघाताची माहिती आपल्या नातेवाईकांना दिली.

स्थानिकांची धाव

अपघाताच्या आवाजाने स्थानिक ग्रामस्थ व या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. मात्र, ज्या ठिकाणी जीप कोसळली तेथे जाणे अवघड होते. त्यामुळे जखमींना बाहेर आणण्यासाठी मार्ग करावा लागला. या घटनेची माहिती ऊग्णवाहिका, पोलिसांना देण्यात आली. अपघातस्थळी वाहतूक पोलीस, सावंतवाडी पोलीस दाखल झाले. पोलीस, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची टीम व ग्रामस्थांनी गंभीर जखमींना कारमधून सुरक्षित बाहेर काढत उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा ऊग्णालयात आणले. यावेळी ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख ऊपेश राऊळ, शिंदे शिवसेनेचे झेवियर फर्नांडिस, सामाजिक बांधिलकीचे पदाधिकारी यांनीही मदतकार्य केले. गंभीर जखमी श्रीमती नानोडकर, विलासिनी सातार्डेकर यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. गंभीर जखमी चालक सनी नानोडकर, उज्ज्वला कांबळी, पांडुरंग नानोडकर यांच्यावरही उपजिल्हा ऊग्णालयात प्राथमिक उपचार करून गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले. मात्र, पांडुरंग नानोडकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तिघांच्या म्त्यूने नातेवाईकांनी आक्रोश केला.

सावंतवाडी उपजिल्हा ऊग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत, डॉ. गिरीश चौगुले, डॉ. निखिल अवधूत, सर्व परिचारिकांनी उपचार केले. पोलीस, सामाजिक बांधिलकीचे पदाधिकारी प्रा. सतीश बागवे, समिरा खलील, शैलेश नाईक, रवी जाधव, रुपा मुद्राळे, लक्ष्मण कदम, नगरसेवक तथा ऊग्ण कल्याण समितीचे सदस्य देव्या सूर्याजी, नातेवाईक आदींनी मदतकार्य केले. अपघातस्थळी सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, हेड कॉन्स्टेबल हनुमंत धोत्रे, मनोज राऊत, प्रिया नाईक, नीलेश नाईक यांनी धाव घेतली. या अपघाताची माहिती समजताच भिरवंडे येथील रहिवासी व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी सावंतवाडीत धाव घेतली. तसेच साळगावचे माजी आमदार जयेश साळगावकर यांनीही रुग्णालयात भेट देत मदतकार्य केले. मृत महिलांचे शव विच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

पाच तोळ्यांचे मंगळसूत्र गायब

अपघातात मृत झालेल्या विलासिनी सातार्डेकर यांच्या गळ्यातील पाच तोळ्याचे मंगळसूत्र अद्याप नातेवाईकांना सापडलेले नाही. नातेवाईकांनी याबाबत पोलिसांना कल्पना दिली.

नियतीचा क्रूर डाव...आई आज येऊ नकोस!

कणकवली भिरवंडे-भिवणेवाडी येथील विलासिनी सातार्डेकर यांनी गावी भिरवंडेत परतण्यापूर्वी आपल्या मुलाला कॉल करत आम्ही गावी येतो, असे सांगितले. त्यावेळी मुलाने आईला ‘आज तुम्ही येऊ नका’, असे सांगितले. तरीदेखील ते  प्रवासाला निघाले. मात्र, वाटेत नियतीने एका क्षणात मृत्यूच्या दरीत आणले. या घटनेने मृत विलासिनी सातार्डेकर यांच्या भिरवंडे येथील गावात व नानोडकर कुटुंबाच्या म्हापसा-गिरी या गावावर शोककळा पसरली आहे. चालक सनी नानोडकर हे गिरी गावचे माजी सरपंच, तर मृत श्रीमती नानोडकर या ग्रामपंचायत सदस्या होत्या. मृत विलासिनी सातार्डेकर यांच्या पश्चात पती, चार मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

जायचे होते बसने, मात्र गेले थारने : गिरीच्या नानोडकर कुटुंबीयांवर काळाचा घाला

जाण्याची वेळ आली की तेथे कुणाचेही चालेना, अशी म्हण आहे. देवाचे बोलावणे आले की त्यांना कोणीही आवरू शकत नाही. हेच नेमके गिरी येथील नानोडकर कुटुंबीयांच्या बाबतीत घडले. काल सोमवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या दरम्यान गिरी येथील पांडुरंग नानोडकर व पत्नी श्रीमती नानोडकर, आपली मेहुणी विलासिनी सातार्डेकर यांना कणकवली येथे तिच्या घरी पोहोचविण्यासाठी बसने जाणार होते. त्यावेळी पांडुरंग यांनी आपला मुलगा सनी याला फोन करून आपण बसने तुझ्या मावशीला पोहोचविण्यास जातो, असे सांगितले खरे मात्र नियतीला पुढील दोन तासात वेगळेच करायचे होते. सनीने आपण थार गाडीने तुम्हाला नेतो असे सांगून थांबण्यास सांगितले. म्हापशाला येऊन त्यांना घेऊन ते कणकवलीला जात असतानाच नियतीने त्यांच्यावर घाला घालून आपल्याजवळ ओढून नेले. अवघ्या काही क्षणातच कुटुंबातील तिघांना मृत्यूला सामोरे जावे लागले. गावात या अपघाताची बातमी पसरताच संपूर्ण गिरी गाव शोकात गेला. ग्रामस्थांनी त्यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली. या तिघांच्या अपघाती मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

समाजसेवक नानोडकर कुटुंबीय

सनी नानोडकर पंच आहेत. त्यांच्या आई श्रीमती नानोडकर या गिरी पंचायतीच्या पंच सदस्य होत्या. सनी यांनी यापूर्वी गिरी पंचायतीचे सरपंचपदही भूषविले आहे. माजी मंत्री जयेश साळगावकर यांचे ते निकटवर्तीय आहेत. सकाळी पंच सनी नानोडकर काही काम असल्याने हणजूण पंचायतीमध्ये गेले होते. तेव्हाच त्याला वडिलांचा आपण सावंतवाडीला जातो, असे सांगणारा फोन आला होता.

 थारचालक सनीला डुलकी का लागली?

अपघातात मृत्यू आलेले सनीचे वडील आंबे विकण्याचे काम म्हापसा बाजारपेठेत मुख्य दरवाजाजवळ करीत होते. सोमवारी पहाटे चार वाजता बाहेरून येणारे आंबे घेण्यासासाठी सनी म्हापसा बाजारपेठेत आला होता. सर्व काम आटोपून तो घरी परतला होता. पहाटे उठल्याने त्याला जागरण झाली होती. म्हणून थार चालविताना त्याला डुलकी लागली असता थार गाडीवरील त्याचे नियंत्रण गेले आणि हा अपघात घडला.

Advertisement
Tags :

.