रुद्रप्रयाग भूस्खलनात तिघांचा मृत्यू, 17 बेपत्ता
उत्तरकाशीत गंगोत्री महामार्ग कोसळला
वृत्तसंस्था/ रुद्रप्रयाग
उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये शुक्रवारी भूस्खलनामुळे 20 जण बेपत्ता झाले. यापैकी 3 जणांचे मृतदेह सापडले असून इतर 17 जण अद्याप बेपत्ता आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम बचावकार्यात गुंतली आहे. शनिवारी दिवसभर दरड हटवून बेपत्तांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केले जात होते. मात्र, पाऊस आणि दरड कोसळण्याच्या धोक्यामुळे अतिशय सावधपणे ही मोहीम राबविली जात आहे.
रुद्रप्रयागमध्ये गुरुवारी रात्री झालेल्या भूस्खलनात अनेक दुकाने व टपऱ्या दरडीखाली गेल्या होत्या. सुरुवातीला 13 लोक बेपत्ता असल्याचा दावा केला जात होता. मात्र, हा आकडा 20 च्या आसपास असल्याचा दावा केला जात आहे. राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे मंदाकिनी नदीला उधाण आल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी शनिवारी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
18 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिह्यात शनिवारी सकाळी गंगोत्री महामार्गाचा 60 मीटरचा भाग खचल्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, आज देशातील 18 राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि पूर्व राजस्थानचा समावेश आहे. बदरपूर, आरके पुरम आणि वसंत विहारसह दिल्लीतील अनेक भागात शनिवारी सकाळी पाऊस झाला. दक्षिणेकडील राज्यांमध्ये सध्या पावसाचे प्रमाण सर्वसामान्य पातळीवर असल्याचे दिसून येत आहे.