तीन सेकंदांमध्ये तीन देश...
अवघ्या तीन सेकंदांच्या कालावधीत कोणी तीन देश फिरु शकेल काय, असा प्रश्न कोणी कोणाला विचारला, तर त्याचे उत्तर नाही असेच आहे. पर्यटनाची हौस असणारे अनेक लोक असतात. अनेक देश पाहणे हा त्यांचा छंद असतो. त्यासाठी ते कष्टाच्या कमाईचा मोठा भाग खर्चही करतात आणि प्रवासाच्या आवडीसाठी वेळही काढतात. पण काहीही झाले तरी माणूस तीन सेकंदांमध्ये तीन देश फिरणे सोडाच, पण तशी केवळ कल्पनाही करु शकणार नाही, असेच प्रत्येकाला वाटेल. पण एका युवतीने हा समज खोटा ठरविल्याचे प्रतिपादन केले आहे.
या युवतीचे नाव समरांगी साधू झिलिक असे आहे. तिचे म्हणणे असे आहे की तिने जगातील प्रसिद्ध असे तीन देश तीन सेंकंदांमध्ये पाहिले आहेत. जर्मनी, नेदरलंड आणि बेल्जियम हे ते तीन देश असून ते युरोपात आहेत. हे देश तीन सेकंदांमध्ये पाहिल्याचे या युवतीचे म्हणणे आहे. अर्थातच, ते केवळ तांत्रिकदृष्ट्या खरे आहे. कारण या तीन देशांच्या सीमा आचेन नामक शहरात एकमेकांना भिडतात. याचाच अर्थ असा की, हे शहर या तीन्ही देशांच्या तिठ्ठ्यावर आहे. ही युवती या शहरामध्ये अशा एका पॉईंटवर पोहचली, की तो या तीन्ही देशांना जोडतो. या पॉईंटवर ही युवती पोहचल्याने तिने तीन्ही देश केवळ तीन सेकंदांमध्ये पाहिल्याचे प्रतिपादन केले आहे. हा बिंदू असा आहे, की केवळ तीन पावले टाकली तर आपण या तीन देशांमध्ये प्रवेश करु शकता. तीन पावले टाकण्यासाठी तीन सेंकंद पुरसे आहेत, असे या युवतीचे म्हणणे असून तांत्रिकदृष्ट्या ते खरेही आहे. मात्र, कोणत्याही देशात जाण्यासाठी व्हिसा लागतो. तो तिला कसा मिळाला, असा प्रश्न काहीजणांच्या मनात आहे. पण युरोपात ही सोय आहे. तिथे पर्यटकांना अनेक देशांचा संयुक्त व्हिसा दिला जातो. त्यात या तीन देशांचाही समावेश आहे.
या युवतीने हा व्हिसा मिळविल्याने ती कोणत्याही अडथळ्यांविना या तीनही देशांमध्ये एकेक पाऊल ठेवून त्यांचा प्रवास करु शकली आहे. अर्थात, असे करणारी ती एकमेव आहे असे नाही. कारण या बिंदूला भेट दिलेले अनेक पर्यटक आहेत. तथापि, तिने ही बाब एक व्हिडीओ प्रसारित करुन सर्वांपर्यंत पोहचविल्याने तिचा हा तीन देशांचा प्रवास सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडीओला लाखो लाईक्स मिळालेले असून तिच्या कल्पनाशक्तीचे कौतुक होत आहे.