श्रीजेशच्या जागी गोलरक्षकासाठी तिघे दावेदार
हॉकी संघ नव्या गोलरक्षकाच्या शोधात : सुरज करकेरा, पवन मलिक व कृष्णा पाठक यांच्यात चुरस
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर, नवी दिल्ली
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने शानदार कामगिरीसह कांस्यपदक नावावर केले. सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर हॉकी संघावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. अशातच भारतीय हॉकी संघाचा वॉल म्हणून ओळख असणारा अनुभवी गोलकीपर पीआर श्रीजेशने पॅरिस ऑलिम्पिकनंतर राष्ट्रीय संघातून निवृत्तीची घोषणा केली आहे. श्रीजेशची जागतिक स्तरावर सर्वात्तम गोलकिपर म्हणून ओळख आहे. आता त्याच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाच्या गोलपोस्टची जबाबदारी कोण घेणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. श्रीजेशची जागा घेऊ शकतील असे तीन संभाव्य गोलरक्षक हॉकी इंडियाच्या शर्यतीत आहेत. आगामी काळात भारतीय संघाचा गोलकिपर केण होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
36 वर्षीय श्रीजेशने आपल्या 18 वर्षांच्या कारकिर्दीत भारतीय हॉकीसाठी 336 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाच्या अनेक विजयात त्याने मोलाचे योगदान दिले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्येही श्रीजेशच्या दमदार कामगिरीच्या जोरावर ग्रेट ब्रिटन, स्पेनविरुद्ध सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. आता, दिमाखदार अश कामगिरीनंतर श्रीजेशने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. अनेक वर्षे भारतीय संघाची भक्कम वॉल असणारा श्रीजेश आता संघात असणार नाही. हॉकी इंडियाने आता नव्या गोलरक्षकाची शोधमोहिम सुरु केली आहे. हॉकी इंडियाच्या यादीत सध्या कृष्णा पाठक, सुरज करकेरा व युवा पवन मलिक यांची नावे आघाडीवर आहेत. यामध्ये कृष्णा पाठकचे नाव सध्याच्या घडीला आघाडीवर आहे. या तीन गोलरक्षकांच्या कामगिरीचा घेतलेला थोडक्यात आढावा.
- कृष्णा पाठक - सध्याच्या घडीला कृष्णा हा भारतीय संघाचा सर्वात अनुभवी गोलरक्षक आहे. 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये पदार्पण करणाऱ्या कृष्णाने आतापर्यंत 125 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. दोन आशियाई क्रीडा स्पर्धेत पदके जिंकून त्याने आपली योग्यता सिद्ध केली आहे. याशिवाय, राष्ट्रीय स्तरावर देखील त्याने आपली चमक दाखवली आहे. श्रीजेशसोबत एफआयएच प्रो लीगमध्ये खेळताना त्याने वेगवेगळ्या क्वार्टरमध्ये गोलकीपिंगची जबाबदारी घेतली आहे. आंतरराष्ट्रीय अनुभवासह, कृष्णाला सध्या भारतीय गोलकीपिंगच्या जबाबदारीसाठी सर्वात मजबूत उमेदवार मानले जात आहे.
- सुरज करकेरा - सूरज गेल्या 7 वर्षांपासून राष्ट्रीय संघाचा भाग आहे, मात्र त्याने आतापर्यंत 43 सामने खेळले आहेत. 2017 आशिया चषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या संघाचा भाग असलेल्या सूरजने आपले गोलकीपिंग कौशल्य सिद्ध केले आहे. नुकत्याच ओमान येथे झालेल्या हॉकी 5 च्या विश्वचषक स्पर्धेत तो भारतीय संघाचा भाग होता. 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही त्याने संघाचे प्रतिनिधित्व केले होते. आता राष्ट्रीय संघात गोलकिपर होण्याचे त्याचे ध्येय आहे.
- पवन मलिक - पवन हा उदयोन्मुख गोलरक्षकांपैकी एक आहे. त्याने गेल्या वर्षी राउरकेला येथे एफआयएच प्रो लीगमध्ये पदार्पण केले. 2021 मध्ये भुवनेश्वर येथे झालेल्या एफआयएच कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेतही त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. पवनने हळूहळू आपल्या खेळात सुधारणा केली आहे आणि आता तो राष्ट्रीय संघात आपले स्थान निश्चित करण्यासाठी सज्ज झाला आहे.