म्यानमारमध्ये तीन ब्रिगेडियर जनरल्सना मृत्युदंड
बंडखोरांसमोर पत्करली होती शरणागती
वृत्तसंस्था/ नाएप्यीडॉ
म्यानमारच्या सैन्याने स्वत:च्या तीन ब्रिगेडियर जनरल्सना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. उत्तर शानच्या लौकईमध्ये ब्रदरहुड अलायन्ससमोर या तिन्ही ब्रिगेडियर जनरल्सनी शरणागती पत्करली होती. अन्य तीन ब्रिगेडियर जनरल्सना आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
4 जानेवारी रोजी जुंटाच्या 200 हून अधिक अधिकाऱ्यांसमवेत सुमारे 2400 सैनिकांनी चीन सीमेवर कोकांगमध्ये म्यानमार नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स आर्मीसमोर (एमएनडीएए) शरणागती पत्करली होती. एमएनडीएएने सैनिक आणि त्यांच्या 1600 नातेवाईकांची मुक्तता केली होती.
लॉककाई मुख्यालय प्रमुख ब्रिगेडियर जनरल मो क्याव थू, कोकांग स्वयंशासित क्षेत्राचे हंगामी प्रमुख ब्रिगेडियर जनरल तुन तुन म्यिंट आणि डिव्हिजन 55 चे कमांडर जनरल जॉ मायो विन यांना मृत्युदंड ठोठावण्यात आला आहे. कथित स्वरुपात तिघांनाही यांगूनच्या तुरुंगात ठेवण्यात आले आहे.
ब्रिगेडियर जनरल ए मिन ऊ, ब्रिगेडियर जनरल थाव जिन ऊ आणि ब्रिगेडियर जनरल आंग जॉ लिन यांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सर्व 6 जनरल्सवर सैन्याच्या कायद्याच्या अंतर्गत लज्जास्पद पद्धतीने स्वत:चे क्षेत्र सोडण्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
कठोर शिक्षा करण्याचा उद्देश कमांडरांमध्ये शरणागती न पत्करण्यासाठी भीती निर्माण करणे असल्याचे मानले जात आहे. लॉककाई येथील पराभवानंर मिन आंग ह्वाइंग यांच्यावर त्यांचे समर्थक राजीनाम्याचा दबाव निर्माण करू शकतात. कारण 2021 मधील सत्तापालटानंर लॉककाई येथील पराभव हा सर्वात मोठा मानला जात आहे. ब्रदरहुड अलायन्समध्ये अराकान आर्मी आणि ताआंग नॅशनल लिबरेशन आर्मी सामील आहे. मागील वर्षी 27 ऑक्टोबर रोजी उत्तर शांन प्रांतात ऑपरेशन 1027 ची सुरुवात करण्यात आली होती.