तीन बिहारींची झारखंडमध्ये हत्या
वृत्तसंस्था/ चाईबासा
झारखंडमधील पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भाग असलेल्या गुद्री पोलीस स्टेशन हद्दीत कपडे विकणाऱ्या तीन बिहारींची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना रविवारी घडल्याचे बोलले जात असून पश्चिम सिंगभूम जिह्याचे पोलीस प्रमुख आशुतोष शेखर यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. अतिशय नक्षलग्रस्त आणि मागास क्षेत्र असल्याने पोलिसांना घटनेची माहिती उशिरा मिळाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपासकार्य सुरू केले आहे. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. त्यांचे वाहन आणि सामानही गायब करण्यात आले आहे.
तुलसी कुमार, राकेश कुमार आणि रमेश कुमार अशी मृतांची नावे आहेत. तुलसी कुमार हा बिहारमधील मोतिहारी येथील रहिवासी आहे. तर राकेश कुमार आणि रमेश कुमार हे बिहारच्या शिवहार जिह्यातील राहणारे होते. मारेकऱ्यांनी त्यांना बेदम मारहाण करून दगडाने डोके ठेचल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.
गुद्री पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जतरमा गावात नदीकाठच्या जंगलाजवळ 3 अनोळखी व्यक्तींचे मृतदेह दिसल्याची माहिती ग्रामस्थांच्या माध्यमातून पोलिसांना मिळाली. याबाबत पोलीस अधीक्षक आशुतोष शेखर यांनी घटनेची माहिती मिळताच पडताळणी व आवश्यक कार्यवाहीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी, चक्रधरपूर यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम पथक तयार केले आहे.