म्हापसा स्थानबद्धता केंद्रातून तिघे बांगलादेशी झाले पसार
पणजी : म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्रातून (डिटेंशन सेंटर) तिघा बांगलादेशी नागरिकांनी छताचे पत्रे काढून पोबारा केल्याची घटना रविवारी पहाटे घडली. याबाबत सुरक्षा रक्षकांना माहिती मिळताच या बांगलादेशींना शोधण्यासाठी एकच पळापळ सुऊ झाली. तोपर्यंत तिघेही पसार झाले होते. रविवारी सगळाच कारभार सुस्त असल्याची संधी साधून बांगलादेशी नागरिकांनी त्याचा फायदा घेतला. तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
स्थानबद्धता केंद्रातून पळालेल्या बांगलादेशींमध्ये मोहम्मद नयन हवलादेर (19), मोहम्मद हिलाल (35) व मोहम्मद मरिदा (25) यांचा समावेश आहे. ही घटना रविवारी 11 रोजी पहाटे 5 च्या सुमारास उघडकीस आली. स्थानबद्धता केंद्रातील कर्मचाऱ्यांना वरील तिन्ही बांगलादेशी नागरिक त्यांच्या खोलीत नसल्याचे आढळून आले. कर्मचाऱ्यांनी आतमध्ये जाऊन पाहिले असता खोलीचे छत उघडे दिसले. लगेच त्यांनी ही माहिती अधिकाऱ्यांना दिली. या केंद्राच्या आजूबाजूच्या परिसरात त्यांचा शोध घेण्यात आला. पण ते सापडू शकले नाहीत. काही वर्षांपूर्वी या तिघांनाही पेडणे पोलिसांनी चोरी प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना शिक्षाही ठोठावली होती. तुऊंगातून सुटल्यानंतर ते बेकायदेशीरपणे गोव्यात राहत असल्याचे उघड झाले असता त्यांना म्हापसा येथील स्थानबद्ध केंद्रात ठेवण्यात आले होते.