काणकोणात 15 लाखांचा गंडा घालणारे त्रिकुट गजाआड
दोघे काणकोणातील तर एकटा मडगावातील : काणकोण पोलिसांची कारवाई
काणकोण : सार्वजनिक बांधकाम खात्यात अभियंत्याच्या नोकरीचे आमिष दाखवून 15 लाख रुपयांची रक्कम उकळल्याप्रकरणी महालवाडा, पैंगीण येथील मिथील च्यारी, इडडर, लोलये येथील प्रितेश च्यारी आणि मडगाव येथील पराग रायकर या तिघांना काणकोणच्या पोलिसांनी अटक केली आहे. काणकोणच्या न्यायालयात या तिघांनाही उभे केल्यानंतर प्रत्येकी 10 हजार रुपयांच्या वैयक्तिक बॉण्डवर त्यांना जामिनावर सोडण्यात आले. मात्र पुढील तपासासाठी 10 दिवस काणकोणच्या पोलिसस्थानकावर तिघांनाही हजेरी लावावी लागणार आहे.
इडडर, लोलये येथील निशा च्यारी यांनी यासंबंधी काणकोणच्या पोलिसस्थानकावर तक्रार केली आहे. आपल्या दिराच्या सरकारी नोकरीसाठी प्रितेश च्यारी याच्या खात्यावर 6 लाख रुपये, मिथिल च्यारी याच्या खात्यावर 6 लाख रुपये आणि 3 लाख रुपये रोख देण्यात आले होते. ही सर्व रक्कम सरकारी नोकरीसाठी पराग रायकर यांना देण्यात आली आहे, असे तक्रारीत च्यारी यांनी म्हटले असून या तक्रारीस अनुसरून तिघांनाही काणकोणच्या पोलिसांनी अटक केली आहे. काणकोणचे पोलिस निरीक्षक हरिश रा. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाबू देसाई पुढील तपास करत आहेत.