गोळीबारप्रकरणी तिघांना कोल्हापूरात अटक
सातारा :
डिसेंबर महिन्यात जावळी तालुक्यातील जय मल्हार हॉटेलमध्ये बारबाला नाचवत असताना झालेला वाद मनात ठेवून पाच जणांनी दोघांचा काटा काढण्याचा डाव आखला होता. त्यातुन दोघांनी दुचाकीवरून पाठलाग करत कोंडवे येथील पेट्रोल पंपाच्या जवळ पिस्टलमधून फायरिंग केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. त्या प्रकरणी एका संशयिताला तालुका पोलिसांनी अटक करून त्याची चौकशी सुरू केली आहे. त्याच गुह्यात आणखी तिघांना कोल्हापूर येथून सातारा तालुका पोलिसांनी उचलले आहे. त्यांच्या अटकेची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यामुळे त्यांची नावे रात्री उशिरापर्यंत समजु शकली नाहीत.
सातारा तालुक्यातील कोंडवे येथे सोमवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. घटना घडताच सातारा तालुका पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा घटनेची वस्तुस्थिती समोर आली. जावळी तालुक्यातील जयमल्हार या हॉटेलमध्ये बारबाला नाचवताना डिसेंबर महिन्यात वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून पाच जणांनी अमर पवार आणि श्रेयस भोसले यांच्यावर गोळीबार करून त्यांचा गेम करण्याचा प्लॅन आखला होता. त्यासाठी तीन जण कारमधून तर दोघे दुचाकीवरून त्यांचा पाठलाग करत होते. कोंडवे येथील पेट्रोल पंपाच्या जवळ आल्यानंतर दुचाकीवरील दोघांनी त्या दोघांच्या दिशेने गोळीबार करून ते पळून गेले. जखमींवर उपचार सुरू असून सातारा तालुका पोलिसांनी या प्रकरणी एकास अटक केली होती. त्याला न्यायालयाने कोठडी ही सुनावली आहे. मात्र, प्रत्यक्ष गोळीबार करणारे पोलिसांच्या हाती लागले नव्हते. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी पथके तयार करून कोल्हापूर आणि पुण्याच्या दिशेने पाठवली होती. त्यातल्या एका पथकास बुधवारी यश आले असून कोल्हापूर येथून तीन जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या अटकेची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने त्यांची नावे समजू शकली नाहीत.