चिकोडी शहरातील चार चोरी प्रकरणी तिघांना अटक
15 लाख 64 हजार रुपयांचे दागिने, मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी / चिकोडी
दिवसा घरी कोणी नसल्याचे पाहून घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून चोरी केल्याप्रकरणी चिकोडी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. तसेच त्यांच्याकडून चोरण्यात आलेले 15 लाख 64 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे. संजू रामचंद्र बैलापत्तार (वय 36), गजानन पुरंदर कांबळे (वय 28, दोघेही रा. जोडकुरळी, ता. चिकोडी), किरण विशाल शर्मा (वय 20, मूळ नेपाळ, सद्या रा. विजापूर) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
12 ऑक्टोबर रोजी चिकोडी शहरातील विष्णू प्रकाश नेतलकर यांच्या घराचे कुलूप तोडून 370 ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच 1 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम असा सुमारे 12 लाख 61 हजार रुपयांच्या ऐवजाची चोरी करण्यात आल्याची फिर्याद पोलिसात नोंद करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर चिकोडी पोलिसांनी चोरीचा तपास चालविला. या प्रकरणात मूळ नेपाळ येथील व सध्या विजापूर येथे वास्तव्यास असलेला एक तसेच बेळगाव जिह्यातील दोन आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.
त्यांच्याकडून चार चोरी प्रकरणे केल्याचा खुलासा झाला आहे. चोरीच्या वेळी आरोपींनी वापरलेला लोखंडी रॉड, 12 लाख 50 हजार रुपये रोकड, 250 ग्रॅम सोन्याचे दागिने, एक लाख रुपये किमतीचा कॅनोन कंपनीचा कॅमेरा, दोन लाख रुपये किमतीच्या केटीएम बाइक असा एकूण 15 लाख 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपाधीक्षक बसवराज यलीगार, पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक यमनाप्पा मांग, गुन्हा अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक प्रवीण बिळगी, बसवराज ईदली, कर्मचारी के. बी. कांबळे, आर. आर. शिळनकर, एम. पी. सत्तीगेरी, एस. पी. गलगली, एस. बडिगेर, संतोष बडोदे, एम. एफ. पाटील, विनोद ठक्कन्नवर, सचिन पाटील यांनी ही कारवाई केली.