अमर बांदेकर खूनप्रकरणी तिघाजणांना अटक
तिघांकडूनही गुन्ह्याची कबुली : रविवारी हरमल येथील खुनीहल्ला,पर्यटनखात्याविरुद्ध स्थानिकांत संताप
वार्ताहर/हरमल
खालचावाडा हरमल येथील अमर दत्ताराम बांदेकर यांच्या खून प्रकरणात आणखी दोन जणांना मांद्रे पोलिसांनी अटक केल्याने आतापर्यंत एकूण तीन शॅक कर्मचाऱ्यांना अटक करण्यात यश मिळाले आहे. ज्या शॅकवर हा खुनी हल्ला झाला ते शॅक स्थानिक व्यवसायिकाने बिगरगोमंतकीयाला चालवायला दिले होते, नियमानुसार तसे देता येत नाही. म्हणून सरकारने त्या शॅक चालकाला दिलेला परवाना त्वरित रद्द करावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. पर्यटन खात्याकडूनही कारवाई होत नसल्याने लोकांत संताप पसरला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासली असता सुरिंदर हा अमर दत्ताराम बांदेकर यांना मारहाण करीत असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे त्याला त्वरित अटक करण्यात आली होती. मात्र शवचिकित्सा अहवालानुसार अमर बांदेकर यांना एकापेक्षा अनेकांनी मारहाण केली असल्याने त्याच्या शरिरात अनेक ठिकाणी मुका मार लागल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्या शॅकवर काम करणाऱ्या सगळ्या कामगारांना ताब्यात घेतले आणि खाकीचा हिसका दाखविला तेव्हा आणखी दोघांनी अमर बांदेकर यांना मारहाण केल्याचे मान्य केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.
तिघेही बिगरगोमंतकीय कर्मचारी
रविवार 26 रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यास गेलेल्या अमर बांदेकर यांचा शॅक कर्मचाऱ्यांनी त्यांना मारहाण केल्याने मृत्यू झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सुरिंदर कुमार (हिमाचल प्रदेश) याला गुन्हा घडल्याच्या रात्रीच अटक करण्यात आली होती. काल मंगळवारी ललित ठाकूर व बिभीषण कुमार (दोघेही हिमाचल प्रदेशचे) या शॅक कर्मचाऱ्यांना पुराव्यानिशी अटक करण्यात आली आहे. प्रकरणातील तिन्ही संशयित आरोपी शॅकवर काम करीत होते. सीसीटिव्ही फुटेजमध्ये त्यांच्या हालचाली कैद झाल्याने या प्रकरणाला निश्चित न्याय मिळेल, अशी आशा स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
सरकार शॅकचा परवाना का रद्द करत नाही?
पेडणे तालुक्यातील ही घटना दु:खद असून पर्यटन हंगामात घडल्याने तसेच परप्रांतीय लोकांनी एका गोमंतकीयाचा हकनाक बळी घेतल्याने गोमंतकीय खवळलेले आहेत. पर्यटन धोरणानुसार शॅक स्थानिक व्यवसायिकांना दिले असते, तर खून निश्चितच झाला नसता, असे मत नागरिक सुशांत पेडणेकर यांनी व्यक्त केले. मात्र परप्रांतीय लोकांची दादागिरी खपवून घेणार नाही, असे म्हणणाऱ्या सरकारने अगोदर शॅकला दिलेला परवाना रद्द करणे गरजेचे आहे, असेही पेडणेकर म्हणाले.
या खुनी हल्ल्यात सामील असलेल्यांची संख्या वाढणार असून या बिगरगोमंतकीयांच्या गँगमधील सर्वांना खुनाच्या आरोपाखाली तुऊंगाची हवा द्यायला हवी असे मत अमर दत्ताराम बांदेकर यांच्या मातेने व्यक्त केले आहे. अमर यांच्या बालपणी त्यांचे वडील स्व दत्ताराम (न्हानु)बांदेकर यांचे निधन झाले होते. त्यावेळेपासून त्यांच्या आईने (उषा) काबाडकष्ट करून, मासे विक्री करून, दोन पुत्र व एक कन्या, ह्या मुलांना वाढवले, शिक्षण दिले. मात्र त्यांचा आधार आता हरपला आहे. सरकारने त्यांच्या कुटुंबास आधार द्यावा, अशी मागणी होत आहे.