लुटमार प्रकरणी निपाणीच्या तिघांना अटक
कोल्हापूरच्या व्यापाऱ्याला लुटल्याचा प्रकार उघडकीस
वार्ताहर/विजापूर
कोल्हापुरातील एका व्यापाऱ्याची कार अडवून लुटमार केल्याप्रकरणी निपाणीतील तिघांना विजापूर पोलिसांनी अटक केली. राकेश महांतेश सावंत (वय 24), रोहन सुनील वाडेकर (वय 24) व प्रथमेश बाबासाहेब हवालदार (वय 22, रा. निपाणी जि. बेळगाव) यांना अटक करण्यात आली आहे. कोल्हापूरच्या व्यापाऱ्याला विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिळाह तालुक्यात सदर तिघांनी रात्रीच्या वेळी लुटले होते. सदर आरोपींना विजापूर पोलिसांनी तीन दिवसातच अटक करण्याची कारवाई केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, कोल्हापूर येथील व्यापारी अशोक प्रभाकर कुलकर्णी यांची 29 ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी कार थांबवून चाकूचा धाक दाखविला.
यानंतर त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून त्यांच्याकडील 16 ग्रॅम वजनाची सोनसाखळी, 6 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व रोख रक्कम 6000 रुपये लुटल्याची घटना जिह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील कोळ्ळूर क्रॉस तंगडगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोनच दिवसात पोलीस अधीक्षक विजापूर, पोलीस उपअधीक्षक ब. बागेवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार केले होते. सदर प्रकरणाचा तपास गांभीर्याने घेऊन तांत्रिक साहाय्याने या कृत्यामध्ये सहभागी असलेले राकेश महांतेश सावंत (वय 24), रोहन सुनील वाडेकर (वय 24) व प्रथमेश बाबासाहेब हवालदार (वय 22, रा. निपाणी जि. बेळगाव) यांना अटक करून चौकशी केली असता, आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे. त्यांच्याकडून 16 ग्रॅम वजनाची सोनसाखळी, 6 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व 770 रुपयाची रोकड, मोटारसायकल, दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.