हेरॉईन विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या तिघा जणांना अटक
बेळगाव : हेरॉईन हा अमली पदार्थ विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघा जणांना मार्केट पोलिसांनी रविवारी सुभाषनगर येथील प्रियांका रेसिडेन्सीनजीक अटक केली आहे. रेहान महमदगौस रोटीवाले (रा. आंबेडकरनगर, सदाशिवनगर), गणेशकुमार अनिल नागने (रा. पंढरपूर, राज्य महाराष्ट्र), सय्यदजानीश गुलाबअहमद अंगरशा (रा. बारसी, सोलापूर, सध्या रा. सुभाषनगर, बेळगाव), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून आदित्य राजू पडाळकर (रा. सांगली), महमदहुसेन ऊर्फ सैबाज नूरअहमद इनामदार (रा. रुक्मिणीनगर) हे दोघे फरारी आहेत. त्यांच्याकडून 30 हजार रु. किमतीचे 30 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. सुभाषनगर, प्रियांका रेसिडेन्सीनजीक काही जण हेरॉईन या अमली पदार्थाच्या विक्रीच्या प्रयत्नात आहेत, अशी माहिती मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर ठिकाणी छापा टाकून तिघा जणांना अटक केली. तर दोघे फरारी झाले. त्यांच्याकडून 30 ग्रॅम वजनाचे अंदाजे 30 हजार रुपये किमतीचे हेरॉईन जप्त करण्यात आले. संशयितांविरुद्ध मार्केट पोलीस स्थानकात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.