गुंडाकडून पिस्तूल खरेदी करणाऱ्या तिघांना अटक
कोल्हापूर :
परिसरात दहशत माजविण्यासाठी संभाजीनगर येथील सराईत गुंडाकडून दोन पिस्तुल खरेदी करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले. या तिघांकडून एक पिस्तुल, 7 जिवंत काडतूस असा सुमारे 1 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या कारवाईमध्ये पोलिसांनी पिस्तुल खरेदीची चेन उघडकीस आणली आहे.
आशितोष अमर कारंडे (वय 27 फुलेवाडी, रिंगरोड) याने दोन पिस्तल खरेदी करुन एक पिस्तल शुभम अमर साळोखे (वय 28 रा. कुंभार गल्ली, गंगावेश), ऋषिकेश बजरंग पोवार (रा. पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) या दोघांना विकल्याचे समोर आले. यानुसार आशितोष, शुभम, आणि ऋषिकेशला अटक करण्यात आली.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना एक तरुण रंकाळा येथील तांबट कमानीजवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार या परिसरात सापळा रचला असता एक तरुण संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला. त्याला ताब्यात घेवून चौकशी केली असता, त्याने आपले नांव शुभम साळोखे असल्याचे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता, 1 पिस्तल, 4 जिवंत राउंड आणि 1 राउंडची पुंगळी मिळून आली. त्याने हे पिस्तुल आशितोष कारंडे याच्याकडून खरेदी केल्याची कबूली दिली, यानुसार आशितोषला ताब्यात घेवून चौकशी केली. त्याने आठ महिन्यांपूर्वी संभाजीनगर येथील तेजस खरटमल याच्याकडून दोन पिस्तुल आणि 7 जिवंत राउंड खरेदी केल्याची माहिती दिली. यापैकी एक पिस्तुल व 5 राउंड शुभमला तर एक पिस्तुल व 2 राउंड ऋषिकेश पोवार याला विकल्याची कबूली दिली. यानुसार पोलिसांनी ऋषीकेश पोवार यालाही अटक केली. मात्र ऋषिकेशने ते पिस्तुल पुणे येथे विकल्याची कबूली दिली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर पाटील, पोलीस अंमलदार वैभव पाटील, महेंद्र कोरवी, प्रदिप पाटील, योगेश गोसावी, विशाल खराडे, संतोष बरगे यांनी ही कारवाई केली.
एक लाखात केली खरेदी
संभाजीनगर येथील सराईत गुंड तेजसकडून आशितोषने 50 हजार रुपयांना एक असे दोन वेपन खरेदी केले. याची विक्री प्रत्येकी 1 लाख रुपये प्रमाणे शुभम आणि ऋषीकेश यांना केली. शुभमने हे पिस्तुल स्वत:जवळच ठेवले. परिसरात दहशत माजवून खंडणी मागण्याचा त्याचा उद्देश असल्याचे तपासात समोर आले आहे. तर ऋषीकेशने त्याच्याकडील वेपन पुणे येथे विक्री केल्याची माहिती समोर आली आहे. शुभमने आशितोषला टप्प्याटप्याने रक्कम दिली आहे. 25 हजार रुपये अॅडव्हान्स, यानंतर 50 आणि नंतर 15 आणि 10 अशी रक्कम दिली आहे.
ऋषीकेशवर तीन गुन्हे
ऋषीकेश पोवार याच्यावर यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत. मुदाळतिट्टा येथे सहा महिन्यापूर्वी स्क्रॅप व्यावसायीकांच्या आर्थिक वादातून गोळीबार करण्यात आला होता. यामध्येही ऋषीकेशचा समावेश होता. तसेच मारामारीचाही गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. आता त्याच्यावर आर्म अॅक्टचा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यामध्ये त्याने पिस्तुलची विक्री कोणास केली याचा शोध पोलीस घेत आहेत.