सोशल मीडिया पोस्ट प्रकरण खटल्यातील म. ए. समितीचे तीन कार्यकर्ते निर्दोष
बेळगाव : सीमाभागात मराठी भाषिकांच्यावतीने पाळल्या जाणाऱ्या 1 नोव्हेंबर काळ्या दिनासंदर्भात सोशल मीडियावर जनजागृती केल्याने खडेबाजार पोलिसांनी 2016 मध्ये समितीच्या तीन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे या प्रकरणी जेएमएफसी तृतीय न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू होती. मात्र, सरकारी पक्षातर्फे गुन्हा साबित करता न आल्याने न्यायालयाने तिघांची निर्दोष मुक्तता केली आहे. केदारी करडी, राहणार मच्छे, मारुती पाटील, दत्ता येळ्ळूरकर अशी निर्दोष मुक्तता झालेल्या म. ए. समिती कार्यकर्त्यांची नावे आहेत. 1 नोव्हेंबर 2016 रोजी म. ए. समितीच्यावतीने सीमाभागात काळादिन गांभीर्याने पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे वरील तिघांनी ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, ‘आम्ही चाललोय, तुम्हीपण या’, ‘रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में’, ‘जय महाराष्ट्र’, ‘1 नोव्हेंबर संपूर्ण सीमाभाग काळा दिन’ अशा प्रकारची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली होती.
त्यामुळे या प्रकरणी खडेबाजारचे तत्कालिन पोलीस निरीक्षक यु. एच. सातेनहळ्ळी यांनी सुमोटो गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोप दाखल केला होता. वरील तिघांना अटक करून त्यांचे मोबाईलही जप्त केले होते. या खटल्याची सुनावणी न्यायालयात सुरू होती. पण सरकार पक्षाला गुन्हा साबित करता न आल्याने त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. जप्त केलेले तिघांचे फोन त्यांना पुन्हा परत करण्यात यावेत, त्यांनी ते न स्वीकारल्यास सरकारला जमा करण्यात यावेत, असा आदेशही न्यायालयाने सरकारला बजावला आहे. या सर्वांतर्फे अॅड. महेश बिर्जे, अॅड. प्रताप यादव, अॅड. बाळासाहेब कागणकर, अॅड. रिचमॅन रिकी, अॅड. वैभव कुट्रे, अॅड. स्वप्निल नाईक, अॅड. प्रज्ज्वल अथणीमठ यांनी काम पाहिले.