बिद्रोळी खून प्रकरणी तीन आरोपींना जन्मठेप
कारवार : हल्याळ तालुक्यातील बिद्रोळी येथील खून प्रकरणी तीन आरोपींना जन्मठेपेची आणि प्रत्येकी 25 हजार रुपयांचा दंड भरण्याची शिक्षा शिरसी येथील प्रथम अतिरिक्त जिल्हा सत्र (कारवार आणि यल्लापूर पीठ) न्यायालयाचे न्यायाधीश किरण किणी यांनी ठोठावली आहे. शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे अक्षय उर्फ आकाश कित्तुरकर, पांडूरंग कित्तुरकर आणि लता उर्फ तुसाई कित्तुरकर अशी आहे. या प्रकरणी दोन आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे. निर्दोष सुटका करण्यात आलेल्यांची नावे गणपती कित्तुरकर आणि लक्ष्मण कित्तुरकर अशी आहेत. खुनाची घटना 3 सप्टेंबर 2019 रोजी घडली होती. या प्रकरणाबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, हल्याळ तालुक्यातील बिद्रोळी येथील कित्तुरकर कुटुंबीयामध्ये मालमत्तेच्या वाटणीवरून वाद सुरू होता.
केशव कित्तुरकर हा आपल्या वडिलांच्या मालमत्तेची वाटणी करून आपणाला द्यावी, अशी मागणी करीत होता. तथापि शिक्षा ठोठावण्यात आलेले आरोपी त्याला हिस्सा देण्यास टाळाटाळ करीत होते. वाटणीवरून कित्तुरकर कुटुंबीयामध्ये वाद उफाळून आला आणि आरोपींनी केशव याला प्लास्टिकच्या दोरखंडाने मारहाण केली. त्यानंतर आरोपीनी केशवला खांब्याला बांधले आणि त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर आरोपींनी केशवच्या कपड्यावर पडलेले रक्ताचे डाग महागात पडतील असे समजून त्याचे कपडे बदलून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. हल्याळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बी. एस. लोकापूर यांनी प्रकरणाची कसून चौकशी करून आरोपींच्या विरोधात एफआयआर दाखल केले होते. सरकारी वकील म्हणून राजेश मळगीकर यांनी काम पाहिले. खून करण्यात आलेला केशव हा पांडूरंग कित्तुरकर यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा होता असे सांगण्यात आले. तो आपल्या वडिलांच्या मालमत्तेतील वाटणीची मागणी करीत होता.