गौरी लंकेश हत्या प्रकरणातील तीन आरोपींना जामीन
उच्च न्यायालयाने मंजूर केला जामीन
प्रतिनिधी/ बेंगळूर
पुरोगामी विचारसरणीच्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील तीन आरोपींना मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती एस. विश्वजित शेट्टी यांच्या एकसदस्यीय पीठाने आरोपी अमित डिगवेकर, एच. एल. सुरेश आणि के. टी. नवीनकुमार यांना जामीन दिला आहे.
उच्च न्यायालयाने गौरी लंकेश हत्या प्रकरणातील तीन आरोपींनी दाखल केलेल्या जामीन याचिकेवरील सुनावणी पूर्ण करून निकाल राखून ठेवला होता. मंगळवारी कलबुर्गी खंडपीठातून न्यायाधीशांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे निकाल जाहीर करत तीन आरोपींना जामीन मंजूर केला आहे. अमित डिगवेकर हा या प्रकरणातील 5 वा, सुरेश 7 वा आणि नवीनकुमार हा 17 वा आरोपी आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील एम. अरुण श्याम यांनी युक्तिवाद केला होता.
प्रकरणातील आरोपी मोहन नायक याला 2023 मध्ये उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यानुसार आपल्यालाही जामीन द्यावा, असा युक्तिवाद आरोपींनी केला होता. तर सरकारी पक्षाच्या वकिलांनी त्यावर आक्षेप नोंदविताना मोहन नायक याने जामिनासाठी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाच्या दुसऱ्या खंडपीठाने फेटाळली होती. या प्रकरणात जामीन मिळविणारा मोहन नायक हा एकमेव आरोपी आहे. त्याच्या जामिनावर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावरील सुनावणी बाकी आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी
5 सप्टेंबर 2017 रोजी घरी परतत असताना गौरी लंकेश यांची त्यांच्या बेंगळूरच्या राजराजेश्वरीनगर येथील निवासस्थानाबाहेर गोळीबार करून हत्या करण्यात आली होती. अमोल काळे याच्यावर हत्येचा कट आणि मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप आहे. तर परशुराम वाघमोरे याच्यावर गोळीबार केल्याचा आणि गणेश मिस्किन याच्यावर दुचाकी चालवून आरोपींना साथ दिल्याचा आरोप आहे.