‘आप’चे तीन आमदार भाजपमध्ये सामील
पंजाबमधील राजकारणात खळबळ : आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी सत्ताधारी पक्षाला दणका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे (आप) तीन आमदार सोमवारी भाजपमध्ये सामील झाले आहेत. दिल्लीतील भाजप मुख्यालयात झालेल्या एका छोटेखानी समारंभात तिघांनीही ‘कमळ’ हाती घेतले. यामध्ये अमृतसर उत्तरचे कुंवर विजय प्रताप सिंह, समानाचे चेतन सिंह जोडमाजरा आणि सनाउरचे हरमीत सिंह पठाणमाजरा यांचा समावेश आहे. या तीन आमदारांच्या भाजप प्रवेशामुळे पंजाबच्या राजकारणात गोंधळ उडाला आहे.
गेल्या दोन दिवसात ‘आप’च्या तीन आमदारांनी पक्षात बंड करून राजीनामा दिला आहे. राजीनामा देणारे हे तीन बंडखोर आमदार सोमवारी दिल्लीत भाजपमध्ये दाखल झाल्याने हा ‘आप’साठी मोठा धक्का मानला जात आहे. रविवार, 1 नोव्हेंबर रोजी दोन आमदारांनी पक्षाचा राजीनामा दिल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर सोमवारी सकाळी निलंबित आमदार आणि माजी आयपीएस अधिकारी कुंवर विजय प्रताप सिंग यांनीही पंजाब विधानसभेचा राजीनामा दिल्याने ‘आप’ला आणखी एक दणका बसला. त्यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष कुलतार सिंग संधवान यांना पाठवला आहे.