राजू शेट्टी यांचा दत्ता सामंत करू अशा सोशलमीडीयावर धमक्या- प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पदयात्रा सुरु झाल्यापासून राजू शेट्टी यांना सोशल मीडीयावर धमक्या येत असून राजू शेट्टी यांचा दत्ता सामंत करू अशा आशयाच्या पोस्ट फिरत आहेत. अशी धक्कादायक माहीती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली. तसेच अशा धमक्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना भीक घालणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
साखर कारखानदारांवर आणि राजकिय नेत्यांवर थेट आरोप करताना स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील यांनी आज खळबळजनक खुलासा केला. ते म्हणाले, "स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पदयात्रा सुरू झाल्यापासून साखर कारखानदार घाबरले आहेत. सोशल मीडीयावर राजू शेट्टी यांचा दत्ता सामंत करू अशा आशयाच्या पोस्ट फिरत आहेत. गळीत हंगाम लांबला आहे आणि यामुळे साखर कारखानदार अडचणीत येणार आहेत. मात्र शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा यासाठी शेतकरी संघटना आंदोलन करत आहे. यामुळे अशा पद्धतीच्या धमक्या मिळत असतील तर त्या धमक्यांना स्वाभिमानी भीक घालणार नाही." असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना त्यांनी "गेल्या 22 दिवसांपासून राजू शेट्टी उन्हातून फिरत आहेत. राजू शेट्टींचा दत्ता सामंत करणं त्यांच्यासाठी अवघड नाही. मात्र त्यांनी संघटनेकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर त्याला 'स्वाभिमानी स्टाईल'ने उत्तर दिले जाईल. या धमकी मागे साखर कारखानदारांचे बगलबच्चे असून हे सर्व राजकारणासाठी सुरू आहे. या धमकीसंदर्भात जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे आम्ही तक्रार करणार आहोत."असेही त्यांनी म्हटले आहे.
१६ जानेवारी १९९७ रोजी मुंबईतील पवई येथे मुंबईतील कामगार नेते दत्ता सामंत यांची गोळ्या झाडून हत्या झाली होती.