हिंडलगा कारागृहातून बेंगळुरातील ठेकेदाराला धमकीचा फोन
कारागृह पुन्हा एकदा चर्चेत : ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
हिंडलगा कारागृहातील कथित व्हायरल व्हिडिओवरून मोठा गोंधळ निर्माण झाला असतानाच खून प्रकरणात हिंडलगा कारागृहात बंदिस्त असलेल्या एका आरोपीने बेंगळूर येथील एका ठेकेदाराला धमकावल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे हिंडलगा कारागृह पुन्हा एकदा राज्यात चर्चेत आले आहे. याप्रकरणी बेंगळूर येथील बनशंकरी पोलिसांनी आपल्याकडील दाखल गुन्हा बेळगाव ग्रामीण पोलिसांकडे वर्ग केला असून त्यानुसार पोलिसांनी सोमवार दि. 24 रोजी चौघा जणांविरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे.
इम्रान अंजुम रा. बेंगळूर साऊथ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ग्रेस वॉल्टर जोसेफ, प्रज्वल, हरिष आणि जयंत चौघेही रा. बेंगळूर शहर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेत तपास चालविला आहे. फिर्यादी इम्रान हे गेल्या दोन वर्षांपासून बेंगळूर येथील पद्मनाभनगरमध्ये व्यावसायिक कचरा गोळा करण्याचे काम करतात. 2 जून 2026 रोजी ग्रेस वॉल्टर जोसेफ याने इन्स्टाग्राम आयडीवरून फिर्यादीला संपर्क साधला. मी वॉल्टर बोलत असून हिंडलगा कारागृहात खून प्रकरणात बंदिस्त आहे. मला दरमहा 30 हजार रुपये 1 तारखेला आमच्या प्रज्वल नावाच्या मुलामार्फत दिले पाहिजेत. अन्यथा तुझा मृतदेह तुझ्या कुटुंबीयांना मिळेल, अशी धमकी दिली. त्यानंतर एका मोबाईल क्रमांकावरून प्रज्वल बोलत आहे असा फोन आला. वॉल्टर आण्णाने तुरुंगातून फोन केला आहे. पैसे केव्हा देतोस अशी विचारणा केली. त्यावेळी माझ्याकडे कोणतेही पैसे नाहीत असे म्हणत फिर्यादीने फोन बंद केला. त्यानंतर आणखी एका मोबाईल नंबरवरून जयंत नामक व्यक्तीने फोन केला. काही वर्षांपासून ओळख झालेल्या हरिष नावाच्या व्यक्तीच्या मोबाईलवरून 3 ऑगस्ट रोजी दुपारी मिस्डकॉल आल्याचे पाहून फिर्यादीने त्याला संपर्क साधला. बनशंकरी दुसरा स्टेजनजीकच्या कार्यालयाकडे येण्यास फिर्यादीला सांगितले. दुपारी 2.40 च्या सुमारास कार्यालयाकडे गेल्यानंतर कचऱ्याचा ठेका राऊडी वॉल्टर याचा नातेवाईक जयंत याला मिळाला आहे. त्यामुळे तू ठेका सोडून दे, किरकोळ कारणासाठी कशाला जीव गमावतोस असे धमकाविण्यात आले. त्यावेळी फिर्यादीने ते मान्य केले नाही. प्रज्वल आणि जयंत यांनी कार्यालयात बोलावून ठेका सोडून देण्याची धमकी दिली. प्रज्वलने हरिषच्या सूचनेनुसार वॉल्टरला फोन केला आणि त्याच्याशी बोलण्याचा आग्रह धरला. त्यावेळी वॉल्टरने फिर्यादीला शिवीगाळ करत धमकी दिली. आमची मुले तुला ठार मारतील, मुले घरात घुसून तुला मारहाण करतील, तसेच तुझे तुकडे तुकडेही करू, असे धमकावण्यात आले आहे.
तेव्हापासून संशयित फिर्यादीच्या मागावर आहेत. त्यामुळे भीतीपोटी फिर्यादीने वरील सर्वांच्याविरोधात बनशंकरी पोलीस स्थानकात फिर्याद दिली. मात्र हिंडलगा कारागृहात बंदिस्त असलेल्या वॉल्टरकडून फोन कॉल आल्याने सदर प्रकरण अधिक तपासासाठी बेळगाव ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.