व्यावसायिक वाहन उद्योगाच्या गतीला धोका?
डिझेलच्या वाढत्या किंमतीचा परिणाम होणार असल्याचे संकेत
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
कमी खर्च आणि मागणीमुळे सावरत असलेल्या व्यावसायिक वाहन उद्योगासाठी डिझेलच्या किमतीतील वाढ हा आता सर्वात मोठा धोका म्हणून समोर येत आहे. भारताच्या व्यावसायिक वाहन (सीव्ही) उद्योगाने अखेर आर्थिक वर्ष 2019 पूर्वीची घाऊक विक्रीची सर्वोच्च पातळी ओलांडली आहे. याची मुख्य कारणे आहेत वाहनांची वाढलेली व न परवडणारी किंमत, जीएसटीमुळे कमी झालेला खर्च आणि पायाभूत सुविधांवरील खर्च अशी आहेत.
परंतु, टाटा मोटर्सने या सुधारणेचा फायदा घेत विक्रमी महसूल आणि गेल्या 15 वर्षांतील सर्वाधिक इबीआयटीडीए मार्जिन नोंदवले असले तरी, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश वाघ यांनी संपूर्ण चक्रासमोरील सर्वात मोठा धोका निदर्शनास आणला आहे.
डिझेलची किंमत
ट्रक ऑपरेटरसाठी एकूण मालकी खर्चापैकी 25 ते 50 टक्के वाटा डिझेलचा असतो. किरकोळ डिझेलच्या किमतीत सुमारे 1 रुपयाची वाढ झाल्यास, एकूण मालकी खर्चातही त्याच प्रमाणात वाढ होते. ज्या विभागांमध्ये डिझेलचा वाटा या मर्यादेच्या उच्च पातळीवर आहे, तिथे त्याचा परिणाम अधिक तीव्र असतो.
मुख्यत: वाहन चालकांच्या आर्थिक स्थितीत झालेल्या सुधारणेमुळे, टाटा मोटर्सला आर्थिक वर्ष 2026 मध्ये व्यावसायिक वाहनांच्या बाजारपेठेत तेजी येण्याची शक्यता दिसत आहे.
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश वाघ यांनी म्हटले की, आर्थिक वर्ष 2026 ला ‘व्यावसायिक वाहन उद्योगासाठी एक महत्त्वाचा टप्पा म्हटले आहे, कारण जीएसटी सुधारणा आणि पायाभूत सुविधांवरील सततच्या खर्चामुळे विक्रीचा आकडा आर्थिक वर्ष 2019 पूर्वीच्या सर्वोच्च पातळी ओलांडून गेला आहे.
सप्टेंबर 2025 मध्ये जीएसटी दरात कपात झाल्यामुळे वाहनांच्या सुरुवातीच्या किमती कमी झाल्या आणि दाबून ठेवलेली मागणी पुन्हा वाढली, तर मालवाहतुकीचे दर स्थिर झाले आणि चालकांचा रोख प्रवाह सुधारला. डिझेलच्या किमतीत कोणतीही मोठी वाढ झाल्यास त्याचा उलट परिणाम होईल. यामुळे नुकतेच बाजारात परतलेल्या चालकांचा परिचालन खर्च वाढणार असल्याचे भाकीत केले आहे.
28 फेब्रुवारी रोजी पश्चिम आशियात सुरू झालेल्या युद्धामुळे जागतिक कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. भारतातील किरकोळ ग्राहक आतापर्यंत याच्या पूर्ण परिणामापासून वाचले आहेत, कारण सरकारी तेल विपणन कंपन्या स्वत:च ही उणीव भरून काढत आहेत. पण हे सुरक्षा कवच मर्यादित आहे.