गटशिक्षणाधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी : एकावर गुन्हा
आटपाडी :
गटशिक्षणाधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळी करून मारण्यासाठी अंगावर धावून जाणे, जीवे मारण्यासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्याचा संतापजनक प्रकार घडला. आटपाडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागात अधिकाऱ्यांवर हात उगारत त्यांच्या हातातील कागदपत्र हिसकावून घेत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष सुखदेव हेगडे (रा. आवळाई) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत गटशिक्षणाधिकारी मयूर लाडे यांनी आटपाडी पोलीसात फिर्याद दिली आहे. शिक्षण विभागात गोंधळ माजविण्याच्या व अधिकाऱ्यांवर अरेरावी करण्याच्या उद्योगाने शिक्षण क्षेत्रातून संताप व्यक्त होत आहे
आटपाडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागात गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास संतोष हेगडे हा माहिती अधिकारच्या संदर्भात आला. त्याने माहिती अधिकार अर्जात नमूद नसलेली माहिती गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे मागितली. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी माहिती अधिकार अर्जात नमूद नसलेली माहिती देणार नाही. आपण स्वातंत्र्य अर्ज करा, असे हेगडे याला सांगितले. यावेळी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समोर संतोष हेगडे याने असभ्य वर्तन करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळी केली.
तो गटशिक्षणाधिकाऱ्यांना मारण्यासाठी अंगावर धावून येत वारंवार हात उगारत होता. तसेच जिवे मारण्याची व अॅट्रॉसिटी दाखल करण्याची धमकी संतोष हेगडे देत होता. शिक्षण विभागात अधिकाऱ्यांना शिवीगाळी, अरेरावी करण्याच्या घटनेने खळबळ माजली आहे. तपास महिला पोलीस उपनिरीक्षक करंजकर या करत आहेत