पोलिस मुख्यालय बाम्बने उडवून देण्याची धमकी
डीजीपींना आला ई-मेल, पोलिसांची धावपळ सुरू
प्रतिनिधी/ पणजी
राजधानीत असलेले पोलिस मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा एक ई-मेल पोलिस महासंचालकांना आला आणि पोलिसांची एकच धावपळ सुरू झाली. निनावी आलेल्या या ई-मेलमुळे पोलिस कर्मचारी खडबडून जागे झाले. बॉम्ब निकामी करणारे पथक श्वानपथकासह पोलिस मुख्यालयात दाखल झाले. अग्निशामक दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले होते. मुख्यालयाची संपूर्ण इमारत तपासण्यात आली. नंतर कळले की सदर ई-मेल बोगस होता.
गोवा पोलिसांना पणजीतील पोलिस मुख्यालय आयईडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी इमेलद्वारा देण्यात आली होती. धमकीचा ई-मेल पोलिसांना मिळाला. पोलिसांनी ई-मेलचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यालयात बॉम्ब निकामी करणारे पथक दाखल केले, तसेच याबाबत तपासही वेगवान पद्धतीने सुरू केला होता. एकंदरित, अशा धमकीच्या ई-मेलमुळे पोलिसांची मात्र तारांबळ उडाली. दरम्यान, बॉम्बच्या धमकीमुळे पणजी पोलिस मुख्यालयात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस आणि बॉम्ब निकामी करणारे पथक मुख्यालयात कसून तपास करीत होते.
पोलिस महासंचालकांना पाठविण्यात आलेल्या धमकीच्या ई-मेलबाबत सायबर गुन्हा विभागाने अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून सायबर विभाग तपास करीत आहेत.