जी-20 परिषदेपूर्वी खलिस्तानकडून धमकी
दिल्ली मेट्रो स्थानकांवर देशविरोधी घोषणा
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीत पुढील महिन्याच्या प्रारंभी होणाऱ्या जी-20 शिखर परिषदेपूर्वी खलिस्तानवाद्यांचे लज्जास्पद कृत्य समोर आले आहे. दिल्ली मेट्रोच्या पाच वेगवेगळ्या स्थानकांवर देशविरोधी घोषणा देण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघड झाला. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
जी-20 शिखर परिषदेच्या आधी शीख फॉर जस्टिसने (एसएफजे) दिल्ली मेट्रो स्थानकांवर देशविरोधी घोषणांसंबंधीचे फुटेज जारी केले आहे. या फुटेजमध्ये दिल्लीतील शिवाजी पार्क ते पंजाबी बागपर्यंत अनेक मेट्रो स्टेशनवर ‘एसएफजे’ कार्यकर्ते खलिस्तान समर्थक घोषणा देताना दिसत आहेत. सुरक्षा यंत्रणांना नांगलोई पोलीस ठाण्यात रविवारी सकाळी 11 वाजता घोषणाबाजीची माहिती मिळाली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. चार मेट्रो स्टेशनवर खलिस्तान समर्थक घोषणा देत असल्याचे मेट्रोचे पोलीस उपायुक्त जी राम गोपाल नाईक यांनी सांगितले.