काळादिनाच्या सायकल फेरीत हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा
शहर-तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे आवाहन
बेळगाव : केंद्र सरकारच्या अन्यायाविरोधात 1 नोव्हेंबर 1956 पासून काळादिन पाळला जात आहे. यावर्षीही कडकडीत बंद पाळून काळादिनाच्या सायकल फेरीमध्ये मोठ्या संख्येने सीमाबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे करण्यात आले आहे. 1956 साली भारतातील राज्यांची भाषावार पुनर्रचना करण्यात आली. याच दिवशी पूर्वीच्या मुंबई राज्यातील बेळगाव, कारवार आणि हैदराबादमधील बिदर जिल्ह्यातील काही मराठी भाषिक प्रदेश तत्कालिन म्हैसूर प्रांताला जोडण्यात आले. तेव्हापासून आजतागायत आपल्या मातृभाषेच्या राज्यात जाण्यासाठी बेळगावसह संपूर्ण सीमाभागाचा लोकशाहीमार्गाने लढा सुरू आहे. या लढ्याचा एक भाग म्हणून 1 नोव्हेंबर रोजी काळादिन पाळून सायकल फेरी काढली जाणार आहे. सकाळी 9.30 वाजता धर्मवीर संभाजी उद्यान येथून सायकल फेरीला प्रारंभ होणार आहे. मराठा मंदिर, खानापूर रोड येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
तालुका म. ए. समितीचे आवाहन
सीमाभागातील मराठी भाषिकांना केंद्र सरकारने अद्याप न्याय न दिल्यामुळे शनिवार दि. 1 नोव्हेंबर रोजी कडकडीत हरताळ पाळून काळादिन पाळला जाणार आहे. यानिमित्ताने मूक सायकल फेरी काढली जाणार असून मराठी भाषिकांनी सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळावा, असे आवाहन तालुका म. ए. समितीच्यावतीने करण्यात आले आहे. 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता धर्मवीर संभाजी उद्यान येथून सायकल फेरीला सुरुवात होणार आहे. शहरातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक निघणार असून मराठा मंदिर येथे जाहीर सभा होणार आहे. 1 नोव्हेंबर हा सीमाभागात मराठी भाषिक काळादिन म्हणून मागील 69 वर्षांपासून पाळत आहेत. भाषावार प्रांतरचनेनंतर बेळगावसह संपूर्ण सीमाभाग तत्कालिन म्हैसूर प्रांताला जोडण्यात आला. तेव्हापासून सीमाभागातील मराठी भाषिक केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी काळादिन पाळत आहेत. या दिवशी मराठी भाषिक काळी वस्त्रs परिधान करून मूक सायकल फेरी काढत असतात. यावेळी तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी, युवा आघाडी, महिला आघाडी, घटक समित्यांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस अॅड. एम. जी. पाटील, कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, उपाध्यक्ष रामचंद्र मोदगेकर, लक्ष्मण होनगेकर, विठ्ठल पाटील, मोनाप्पा पाटील यांनी केले आहे.