हजारो प्रजातींची फुले आणि झाडे एकाच ठिकाणी
कोल्हापूरात पुष्प प्रदर्शनाचे आयोजन
कोल्हापूर :
डोळ्यात भरणारी रंगबेरंगी फुलं पाहून एखाद्या थंड हवेच्या ठिकाणची बागच जणू असल्याचे भासते आहे ना ? एखाद्या उंच डोंगरावर टुमदार गावात सुंदरशी बाग रंगबेरंगी फुलापानांनी बहरली आहे, असाच भास होत आहे.
पण हे फोटो कोणत्या थंड हवेच्या ठिकाणची नसून कोल्हापूरातली आहेत. येथे सुरु असलेल्या पुष्पप्रदर्शनातील हे सुंदर दृष्य आहे. कोल्हापूरात महानगरपालिका आणि गार्डन्स क्लब तर्फे महावीर गार्डन येथे पुष्पप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे अनेक पर्यावरण प्रेमी आणि वृक्ष प्रेमी येथे प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.
या पुष्पप्रदर्शनात फक्त गुलाब, झेंडू नाही तर ३०० हुन अधिक देशी, परदेशी फुलं उपलब्ध आहेत. या प्रदर्शनांतर्गत विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये विविध प्रकारची फुले, पुष्परचना, कुंडीतील रोपे, फुले, पाने व पाकळ्यांची रांगोळी, बुके, सॅलड डेकोरेशन, बोनसाय, क्ले मॉडेलिंग, मुक्त रचना, लैंडस्केपिंगच्या यांचा समावेश आहे. तर तरुणाईचे आकर्षण असलेला लाईट्स व डीजे संगीताच्या साथीने बॉटनिकल फॅशन शो आयोजित करण्यात आला आहे. या बॉटनिकल फॅशन शोसाठी निसर्गातील पाना फुलांचा वापर करून विविध महाविद्यालयातील युवक-युवती भाग घेणार आहेत. या फ्लॉवर शोच्या निमित्ताने बागे संबंधी विविध वस्तूंचे स्टॉल आणि सावलीत व घरात ठेवण्यात येणाऱ्या रोपांच्या विक्री चे स्टॉल देखील येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
तीन दिवसांसाठी भरविण्यात आलेल्या या फ्लॉवर शो फेस्टिव्हल पाहण्यासाठी कोल्हापूरसह परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. विविधरंगी फुलांच्या उत्तमोत्तम कलाकृती हे प्रदर्शनातील विशेष आकर्षण आहे. महापालिका आणि गार्डन क्लब माध्यमातून सुरू झाले आहे. गेले ५२ वर्षे हे प्रदर्शन दरवर्षी कोल्हापुरात आयोजित करत असून यामुळे लुप्त होत चाललेली वनस्पती व फुल झाडी तसेच कमी जागेत उत्तमरीत्या बाग कशी साकारायची याचे नमुने येथे दाखवण्यात येत अशी माहिती गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी यांनी सांगितले आहे.