हजारो आंदोलकांना फ्रान्समध्ये अटक
महागाईविरोधात 4 लाख लोक रस्त्यावर : पॅरिसमध्ये पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर
वृत्तसंस्था / पॅरिस
फ्रान्समध्ये महागाई, शाळांची दयनीय अवस्था आणि पोलिसांच्या क्रूरतेचा निषेध करण्यासाठी लाखो लोक रस्त्यावर उतरले आहेत. पॅरिससह अनेक शहरांमध्ये आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत आंदोलनाचे सत्र सुरूच ठेवले आहे. पॅरिसमधील मोर्चामध्ये पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आणि अश्रुधूर सोडल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला होता. गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशभरात सुमारे 1,000 हून अधिक आंदोलकांना अटक करण्यात आली. सरकारच्या आकडेवारीनुसार, या आंदोलनांमध्ये सुमारे 4 लाख लोकांनी सहभाग घेतला. दुसरीकडे कामगार संघटनांनी 8 लाख लोक सहभागी झाल्याचा दावा केला.
सरकारी अंदाजानुसार, पॅरिसमध्ये सुमारे 1 लाख 10 हजार लोकांनी मोर्चा काढला. आंदोलकांनी महागाई, सरकारची पोलीस यंत्रणा आणि शाळांमधील सुविधांच्या अभावाविरोधात आवाज उठवला. त्यांनी सरकारविरोधी फलक हातात घेत आंदोलन छेडले. सुरुवातीला ही निदर्शने शांततापूर्ण होती. विद्यार्थी, पालक आणि ज्येष्ठ नागरिकही यात सहभागी झाले होते. मात्र, मोर्चा संपताच काही मुखवटाधारी व्यक्तींनी पोलिसांवर दगड आणि काचेच्या बाटल्या फेकल्या. काही ठिकाणी कचऱ्याच्या पेट्या जाळतानाच पोलिसांच्या दिशेने फटाके फेकण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी अश्रुधूर, पाण्याचे फवारे आणि स्टन ग्रेनेडचा वापर केला. त्यांनी जमावावर लाठीचार्जही केला.
