‘ओव्हरफ्लो’तून रोज हजारो लिटर पाणी वाया! सीपीआरमध्ये शुद्ध पाण्याची उधळपट्टी
ओव्हरफ्लो रोखण्यासाठी मोटरला सेन्सर बसवण्याची गरज : एकूण 76 टाक्यांमधून पाणी ओव्हरफ्लो : पाण्याच्या नियोजनासाठी कर्मचाऱ्यांची कमतरता : अतिक्रमण टपरीवाल्यांकडूनही मोफत पाण्याचा वापर
इम्रान गवंडी कोल्हापूर
छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रूग्णालयातील (सीपीआर) पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो होत असल्याने रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. सीपीआरमधील विविध इमारतींमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 76 टाक्या आहेत. या टाक्या ओव्हरफ्लो होऊन रोज पाणी वाया जात आहे.
प्रत्येक इमारतीमध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य टाकीला अॅटोमेटीक सेंन्सर बसविल्यास याची गळती रोखता येऊ शकते. त्यादृष्टीने सीपीआर प्रशासना व सार्वजनिक बांधकाम विभागाने समन्वयाने उपाय योजना करण्याची गरज आहे. टाक्यातील पाणी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावरून वाहत असल्याने चिखल निर्माण झाला आहे. यातून वाट काढतच रूग्णांना घेऊन जावे लागत आहे. स्ट्रेचरवरून रूग्णांना उपचारासाठी नेत असताना नातेवाईकांना कसरत करावी लागत आहे. यामुळे नाहक त्रास होत असुन पाण्याची उधळपट्टी होत आहे. त्यातच ड्रेनेजचे पाणीही रस्त्यावरून वाहत असल्याने रूग्ण व नातेवाईकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
सीपीआरमध्ये विविध उपचारासाठी एकूण 18 इमारती आहेत. प्रत्येक इमारतीवर पाण्याच्या टाक्या बसवल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे 2 लाख 50 हजार क्षमता असलेली मुख्य सिमेंटच्या टाकी बांधली आहे. यातून सर्व विभागांना पाणी पुरवठा केला जातो. रोज 2 लाख 50 हजार लिटर पाण्याचा वापर होतो. यातील ओव्हरफ्लोतून रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. सीपीआरमध्ये रोज 36 वार्डमध्ये 1 हजार ते पंधराशे रूग्णांची तपासणी होते. रोज नव्याने 200 रूग्ण अॅडमिट होतात. यासाठी 800 बेड उपलब्ध आहेत. अॅडमिट रूग्ण व त्यांच्यासोबतच्या नातेवाईकांकडूनही पाण्याचा वापर होतो.
पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सेन्सर बसविण्याची गरज
मुख्य पाण्याच्या टाकीतून विविध इमारतीमध्ये पाणी पुरवठा केला जातो. यासाठी प्रत्येक इमारतीवर पाण्याच्या टाक्या बसविल्या आहेत. टाकी भरल्यानंतर कर्मचारी येऊन मोटर बंद करेपर्यंत पाणी वाहतच असते. सेन्सर बसविल्यास पाणी आपोआप बंद होऊन पाण्याचा अपव्यय टाळता येऊ शकतो.
अतिक्रमण टपरीवाल्यांकडून पाण्याचा मोफत वापर
सीपीआरमध्ये अतिक्रमण केलेल्या टपऱ्या चालकांकडून सीपीआरचे पाणी मोफत वापरले. त्याची पाणीपट्टीही दिली जात नाही. लोकप्रतिनिधी व संघटना दबाव असल्याने प्रशासनाकडून जाब विचारण्याचे धाडस होत नाही.
कर्मचारी अपुरे
पाण्याच्या नियोजनासाठी सीपीआरमध्ये सध्या तीनच कर्मचारी आहेत. रोज त्यांना बारा-बारा तास ड्युटी करावी लागते. एखाद्या कर्मचाऱ्याला रजा हवी असल्यास दुसऱ्या कर्मचाऱ्याला सलग ड्युटी करावी लागते. याठिकाणी तीन जागा रिक्त आहेत. पाणी भरून वाहत असल्याचे निदर्शनास येईपर्यंत हजारो लिटर पाणी वाया जाते.
ड्रेनेजचे पाणीही रस्त्यावर
सीपीआरमध्ये 45 कोटी रूपयांच्या निधीतून ड्रेनेज लाईनचे काम सुरू आहे. ड्रेनेज तुंबुन मैलमिश्रीत पाणीही रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे परिसरातून दुर्गंधी सुटली आहे.
सिमेंटच्या टाक्यांची क्षमता टाक्यांची संख्या
-2 लाख 50 हजार लिटर 1
-35 हजार लिटर 4
-52 हजार लिटर 1
-40 हजार लिटर 1
-30 हजार लिटर 3
सिंटेक्स टाक्यांची क्षमता टाक्यांची संख्या
-30 हजार लिटर 7
-20 हजार लिटर 30
-15 हजार लिटर 14
-10 हजार लिटर 15
एकूण टाक्या 76
पाण्याचा अपव्यय टाळण्यसाठी उपाययोजना
ओव्हरफ्लोमधून वाया जाणारे पाणी रोखण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या जातील. पालकमंत्र्यांकडून मिळालेल्या वैद्यकीय निधीतून याचे काम सुरू होणार आहे. पाण्याच्या टाक्यांच्या मोटरींना सेन्सर बसविण्याबाबत सार्वजनिक बांधकामाशी चर्चा करून तोडगा काढला जाईल.
डॉ. शिशिर मिरगुंडे, वैद्यकीय अधिकारी, सीपीआर.